सेरेनाच्या मार्गक्रमणात ओसाका, बार्टीचा अडथळा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सोमवारपासून येथे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा एक महिना लांबणीवर टाकण्यात आली होती. अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्स या स्पर्धेत आपले 24 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळवून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल पण तिच्या मार्गक्रमणात जपानची ओसाका तसेच ऑस्ट्रेलियाची बार्टी यांचा प्रमुख अडथळा राहील.
चार वर्षांपूर्वी सेरेनाने येथे आपली शेवटची स्पर्धा जिंकली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये सेरेना 40 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कदाचीत 2021 हा तिच्या टेनिस कारकीर्दीतील शेवटचा हंगाम ठरू शकेल. दरम्यान सेरेनाला आपले ध्येय साकार करण्यासाठी जपानच्या ओसाका, ऑस्ट्रेलियाची बार्टी आणि सोफिया केनिन यांच्याकडून कडवी लढत अपेक्षित आहे. सोफिया केनिन ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे तर ओसाकाने अमेरिकन गॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविले आहे. सेरेना विल्यम्सचा या स्पर्धेतील पहिला सामना जर्मनीच्या सिगमंडशी सोमवारी होत आहे. सेरेनाने 2017 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकून आपले 23 वे ग्रॅण्ड स्लॅम एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते. ओसाकाचा पहिल्या फेरीतील सामना रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाशी होणार आहे. रूमानियाची हॅलेप तसेच बार्टी यांची कामगिरी या स्पर्धेत चांगली होईल, अशी आशा व्यक्त केली जात जात आहे.