थंडीचा जोर आता ओसरू लागला आहे. वातावरण आल्हाददायक होऊ लागलं आहे. मात्र संध्याकाळी थोडंफार गार वाटतं. अशा वेळी रात्रीच्या जेवणात पालक आणि काळ्या चण्याचं सूप करता येईल. हे सूप चविष्ट आणि पौष्टिकही आहे.
साहित्य : तीन उकडलेले आवळे, चिरलेला पालक एक कप, उकडलेले चणे पाव कप, आलं आणि लसणाची पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा, एक कांदा, एक कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, एक चमचा लोणी किंवा बटर, मिरपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ आणि फ्रेश क्रीम.
कृती : उकडलेले आवळे कुस्करून घ्या. कांदा चिरून घ्या. एका कढईत लोणी घालून कांदा परतून घ्या. त्यात आलं आणि लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. यात पालक घालून शिजवून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. यासोबतच चणे आणि आवळाही वाटून घ्या. आता हे मिश्रण कढईत घाला. त्यात गरजेनुसार व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून उकळून घ्या. चवीसाठी मिरपूड आणि जिरेपूड घाला. मीठ घाला. गॅस बंद करा. शेवटी फ्रेश क्रीम घालून सूप प्यायला द्या.