प्रतिनिधी/ कराड
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना रूवले (ता. पाटण) येथे घडली होती. याप्रकरणी एकास दहा वर्षांच्या तुरूंगवासासह 50 हजार रूपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी सुनावली. आनंदा शामराव साळुंखे (वय 32, रा. रूवले, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सरकारी वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता क्षयरोगाने त्रस्त असल्याचे माहिती असूनही आरोपी आनंदा साळुंखे हा सन 2014 साली त्यांच्या घरात घुसला. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरामध्ये गेल्यावर त्याने पीडितेवर अत्याचार केला. घाबरलेल्या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र आई, वडिलांना जीपखाली ठार मारण्याची धमकी त्याने दिली. धमकीला घाबरून पीडितेने घडल्या प्रकाराची वाच्यता कुठेही केली नाही. दीड महिन्यानंतर तिला त्रास होऊ लागल्यानंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ती गरोदर असल्याचे लक्षात आल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी ढेबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चौगुले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी 17 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे तुरूंगवास व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा एका कलमाखाली सुनावली तर अन्य एका कलमाखाली पाच वर्ष तुरूंगवास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली.