उत्तरप्रदेशातील हाथरस पुन्हा हादरले – तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीचा दबाव
वृत्तसंस्था/हाथरस
उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्हय़ातील नौजरपूर गावात मुलीची छेडछाड करणाऱया लोकांच्या विरोधात तक्रार करणाऱया पित्याची सोमवारी संध्याकाळी गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी पीडित कुटुंबाला धमकावत होता. मृत व्यक्तीच्या मुलीने 6 जणांच्या विरोधात तक्रार केली असून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा पीडितेकडून करण्यात आला आहे.
मृत अमरीश (52 वर्षे) यांच्या कुटुंबानुसार आरोपी गौरवच्या कुटुंबाशी त्यांचे जुने वैमनस्य होते. अमरीश शेतात असताना आरोपीने स्वतःच्या तीन मित्रांसह तेथे पोहोचून गोळीबार केला होता. यातील काही गोळय़ा अमरीश यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱया पित्याच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदविण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
2018 मध्ये केली होती तक्रार
अमरीश यांनी 16 जुलै 2018 रोजी गावातील गौरव शर्माच्या विरोधात मुलीची छेड काढल्याची तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी गौरव 15 दिवस तुरुंगात राहिला होता. जामिनावर बाहेर पडल्यावर आरोपी तक्रार मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबाला धमकावत होता.
अखिलेश यादव घेणार भेट
माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेवरून योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. रामराज्य आणणार असल्याचे सांगणाऱयांच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. पीडित मुलीला भेटण्यासाठी सपचे एक शिष्टमंडळ पाठविण्यात येईल. मी स्वतः त्या मुलीला भेटणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.