कांदा दरात पुन्हा घट : बटाटा दरही कमी
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी लाल कांदा दरात 500 रु., सफेद कांदा 200 रुपयांनी घसरला तर बेळगाव स्थानिक जवारी बटाटा, इंदोर, गुजरात, धारवाड बटाटा 200 रुपयांनी कमी झाला. आग्रा बटाटा 100 रु.नी कमी झाला. गुळाचे भाव मात्र स्थिर होते.
कांदा आवक 50 ट्रक
शनिवारी बाजारात 50 ट्रक कांदा आवक होती. यामध्ये महाराष्ट्रातील 35 ट्रक तर कर्नाटकातील 15 ट्रक कांदा आवक होती. दोन्ही राज्यातील प्रत्येकी 4 ट्रक सफेद कांदा होता. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बेळगाव बाजाराला महाराष्ट्रातून कांदा आवक होत असते. मात्र यावर्षी कर्नाटकातील कांदा आवक सुद्धा होत आहे याचा परिणाम बाजारात कांदा दरात बाजारगणिक घसरण होत असल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ नरेगावी यांनी दिली.
बेळगाव पश्चिम भागातील शिनोळी, बाची, कुद्रेमनी, उचगाव, कल्लेहोळ, सुळगा, आंबेवाडी, तुरमुरी या भागातून मोठय़ा प्रमाणात तर हलगा, बस्तवाड परिसरातून तुरळक प्रमाणात बटाटा आवक होत आहे. शिवाय कडोली, जाफरवाडी, केदनूर, मणिकेरी भागातूनसुद्धा उन्हाळी बटाटा विक्रीसाठी बाजारात येत आहे. याचा परिणाम जवारी बटाटा 200 रु. उतरला असल्याची माहिती व्यापारी अशोक गावडा यांनी दिली.
बाजारात 4000 पोती जवारी बटाटा आवक झाली होती. लाल बटाटा 1200 ते 1600 तर सफेद बटाटा 1000 ते 1400 रु. असा चांगल्या प्रतिच्या बटाटय़ांचा दर झाला. बेळगाव स्थानिक बटाटा आवक वाढली आहे. शिवाय बाजारात भाजीपाला मुबलक प्रमाणात कमी दरामध्ये मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनी बटाटा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारात परराज्यातील बटाटय़ाचे भाव कमी झाले असल्याची माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली.
परराज्यातील 12 ट्रक बटाटा आवक
बेळगाव बाजारामध्ये परराज्यातील 12 ट्रक बटाटा आवक विक्रीला आली होती. यामध्ये इंदोर आणि आग्रा प्रत्येकी 4 ट्रक, गुजरात 3 ट्रक तर धारवाडचा बटाटा एक ट्रक आवक होती.
बाजारातील कांद्याचे भाव
- गोळी 400 ते 600
- गुल्टा 700 ते 1000
- मध्यम 1000 ते 1400
- गोळा 1400 ते 1600
- सफेद 1000 ते 1300
परराज्यातील बटाटय़ाचे भाव
- इंदोर 1400 ते 1600
- आग्रा 1300 ते 1400
- धारवाड 1000 ते 1200
- गुजरात 800 ते 1000