जिल्हाधिकारी कार्यालयाची कारवाई,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत आओ जाओ घर तुम्हारा अशी गत झाली आहे. कोरोनामुळे सवलत दिल्यामुळे पालिकेतील कर्मचाऱयांना वेळेच भान नसते. त्यामुळे सातारा पालिकेत मंगळवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक पोहचले. कोण साडे दहा, कोण पावणे अकरा वाजता पालिकेत आले. अशा लेटलतिफांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने धरपकड केली. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी लेटलतिफांच्या हजेरी पत्रकावर शेरे मारत कारवाई केली. या कारवाईमुळे पालिकेत एकच खळबळ माजली असून या कर्मचाऱयांमुळे नगराध्यक्षांसह नगरसेवकांना शरमेने मान खाली घालावी लागली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करत हजेरी पुस्तकावर शेरा मारल्यामुळे बुधवारी सकाळी सगळे वेळेत हजर झाल्याचे दिसत होते. कोरोनाच्या काळात पालिकेत सवलतच सवलत दिली जात होती. पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत काम करत असत. उशिरा आले तरीही हजेरी पत्रकावर वेळेतच हजेरी लागत होती. पालिकेमध्ये कर्मचाऱयांकडून वेळेचा नियम मोडला जाग होता. दुपारी दीड वाजताच सर्व विभागात सामसुम दिसतात तर दुपारी साडेतीन वाजता पुन्हा कामावर हे अधिकारी कर्मचारी रुजू होतात. पाच वाजेपर्यंत पालिकेत गजबज सुरु होते.
सोमवारी सायंकाळी पालिका कर्मचारी, अधिकाऱयांना पथक तपासणीला येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तरीही पालिकेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे मंगळवारी उशिरा पालिकेत आले. मग पथक दारातच थांबले होते. त्या पथकाकडून जे जे उशिरा आले. त्यांच्या हजेरीपत्रकावर सरळ अपसेंट असा शेरा मारला. त्यांच्या हजेरीपत्रकावर शेरा मारल्याने दिवसभर चर्चा सुरु होती. पथकाकडून इतर विभागाची माहिती तपासण्यात आली. या पथकात उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, लिपीक गंगातिरकर, सुर्यवंशी यांचा सहभाग होता.
कारवाईमुळे सर्वांची झाली नामुष्की
स्वच्छ सर्वेक्षण अभियान असो की कोरोना सर्वेक्षण असो. यामध्ये सातारा पालिकेची कामगिरी सुमार झाली आहे. याला कारण पालिकेचे कर्मचारी. कोणत्याही कामगाराला धरबंद नसल्यामुळे कधी पण या अन् कधी पण जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक कारवाई केल्यामुळे सगळय़ांची पाचावरण धारण झाले आहे. या कारवाईने मात्र नगराध्यक्षांसह नगरसेवकांना नामुष्की पत्करावा लागला.