वृत्तसंस्था/ मियामी
मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष विभागात रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
मेदवेदेव्हने अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोवर 6-4, 6-3 असा सहज विजय मिळवित आगेकूच केली. त्याने या सामन्यात 11 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याची पुढील लढत रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटशी होणार आहे. ऍगटने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचे आव्हान 6-3, 4-6, 7-6 (9-7) असे संपुष्टात आणले. अन्य सामन्यात इटलीच्या यानिक सिनरने फिनलँडच्या एमिल रुसुव्होरीचा 6-3, 6-2 असा पराभव करून पहिल्यांदाच एटीपी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याची पुढील लढत कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकशी होणार आहे. बुबलिकने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झवर 6-7 (5-7), 6-3, 6-4 अशी मात केली. पोलंडच्या 26 व्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाझने कॅनडाच्या 12 व्या मानांकित मिलोस रेऑनिकला 4-6, 6-3, 7-6 (7-4) असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.