मुंबई / वृत्तसंस्था
भक्कम फलंदाजी लाईनअप, जबरदस्त पॉवरहिटर्स आणि डेथ बॉलर्सचा सॉलिड पॅक यामुळे विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स यंदाही आयपीएल जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहेत. मात्र, या संघात अव्वल फिरकीपटूंची वानवा आहे, त्याचा त्यांना फटका बसणार का, हे प्रत्यक्ष स्पर्धेतच स्पष्ट होईल. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 9 एप्रिलपासून खेळवली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने 2019 व 2020 अशा सलग दोन वर्षात आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केले असून सध्या त्यांच्या खात्यावर एकूण 5 जेतेपदे आहेत. या संघातील अव्वल फलंदाजांचा गट सातत्याने कायम राहिला आहे आणि हेच त्यांच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य आहे.
फलंदाजी हे मुंबईचे बलस्थान आहे आणि कर्णधार रोहित शर्मा व दक्षिण आफ्रिकन क्विन्टॉन डी कॉक यांच्या रुपाने जागतिक क्रिकेटमधील दोन भक्कम सलामीवीर त्यांच्याकडे आहेत. आवश्यकता भासल्यास ऑस्ट्रेलियन तडाखेबंद फलंदाज ख्रिस लिनचा पर्याय देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
सूर्यकुमार यादव, युवा इशान किशन यांनी भारतीय संघातर्फे धडाकेबाज पुनरागमन केले असून ते या संघाचे बलस्थान असतील. याशिवाय, अष्टपैलू पंडय़ा बंधू (हार्दिक व कृणाल) तसेच विंडीजचा केरॉन पोलार्ड यांच्यामुळे मुंबईची मधली फळी अतिशय भरभक्कम आहे.
जलद गोलंदाजीच्या आघाडीवर, जसप्रित बुमराहसारखा अव्वल दर्जाचा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या भात्यात असून विवाहामुळे ब्रेकनंतर येथे ताज्या दमाने उतरण्यासाठी तो सज्ज असणार आहे. मागील हंगामात नव्याने दाखल झालेला न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट विशेषतः पॉवरप्लेमध्ये बळी घेण्यात कमालीचा यशस्वी झाला असून अंतिम लढतीत त्याने याची उत्तम झलक दाखवून दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन काऊल्टर नाईलमुळे मुंबईची जलद गोलंदाजी आघाडी आणखी भक्कम बनली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जेन्सन, मोहसीन खान, नॅथन काऊल्टर नाईल, पीयूष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.
मुख्य प्रशिक्षक- महेला जयवर्धने
ही आहे मुंबईची कमकुवत बाजू!
कमकुवत फिरकी गोलंदाजी आघाडी ही कदाचित मुंबईची कमकुवत बाजू ठरु शकते. विशेषतः चेन्नईच्या संथ गोलंदाजीला पोषक चेपॉकवर या संघाची कसोटी लागू शकते. लसिथ मलिंगाने निवृत्ती घेतली असल्याने त्याची जागा भरुन काढणे देखील या संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. फिरकी गोलंदाजीत कृणाल पंडय़ा असला तरी अलीकडेच संपन्न झालेल्या वनडे मालिकेत इंग्लिश फलंदाजांनी त्याची चांगलीच धुलाई केली होती. राहुल चहर हा आयपीएलचे आणखी एक ‘फाईंड’ असलेल्या खेळाडूकडून त्यांना काही अपेक्षा आहेत.
ऑफस्पिनर जयंत यादवला मागील हंगामात केवळ दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली आणि यंदा त्याला किती खेळवले जाईल, हे पहावे लागेल. मुंबईने अनुभवी पीयूष चावलाला पाचारण केले आहे. मात्र, कृणाल व चहर यांनाच खेळवण्याचा निर्णय झाला तर चावलाला देखील राखीव खेळाडूतच बसावे लागेल. चावलाच्या खात्यावर आयपीएलमध्ये 156 बळी आहेत.
हा अष्टपैलू ठरु शकतो प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ!
विंडीजचा अष्टपैलू केरॉन पोलार्ड हा यंदा देखील प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो. पोलार्ड फलंदाजीत विस्फोटक कामगिरी करु शकतो. शिवाय, पाचवा किंवा सहावा गोलंदाज या नात्याने भेदक मारा करु शकतो. मुंबईतर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत पोलार्ड दुसऱया स्थानी आहे. त्याच्या खात्यावर 3023 धावा आहेत तर त्याने 60 बळी देखील घेतले आहेत. मुंबईतर्फे सर्वाधिक धावांच्या निकषावर कर्णधार रोहित 5230 धावांसह अव्वलस्थानी आहे.
पोलार्डने या स्पर्धेत आतापर्यंत 198 षटकार खेचले असून मुंबईतर्फे ही देखील दुसऱया क्रमांकाची कामगिरी आहे. सध्याच्या घडीला या संघातर्फे रोहितच्या खात्यावर 213 षटकार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अन्य बरेच संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील. मात्र, मुंबईचा संघ या सर्वात कागदावरही भरभक्कम आहे. यंदा आयपीएल इतिहासात सहाव्यांदा तर येथे सलग तिसऱयांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.