प्रतिनिधी / पणजी
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या ‘टीका उत्सव’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ओल्ड गोवा ग्राम पंचायतीमधील कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभराच्या मोहिमेत 45 वर्षांवरील 157 लोकांनी लसीकरण करुन घेतले. मळार ओल्ड गोवा येथील 83 वर्षांच्या लक्ष्मी भिकारो नाईक या सर्वांत ज्येष्ठ होत्या.
कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओल्ड गोव्याच्या सरपंच जनिता पांडुरंग मडकईकर यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात करण्यात आली. चंदन वरगांवरकर, आशिष नाईक व अन्य उपस्थित होते. सरपंचांनी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांचे गुलाब देऊन स्वागत केले. दिवसभर चाललेल्या लसीकरण मोहिमेत सर्व ग्रामस्थांबरोबरच, वकिल, डॉक्टर, पत्रकार, माजी आमदार, प्राध्यापक तसेच इतरांनी लसीकरण करुन घेतले.
आरोग्य खात्यातर्फे लसीकरण करण्यात आल्यानंतर जर ताप आला तर घेण्यासाठी तापाच्या गोळय़ा देण्यात आल्या. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकाला एक पाण्याची बाटली, प्रुटी, बिस्किटचा पुडा आमदार मडकईकर यांच्यातर्फे देण्यात आला.
आपला संदेश सर्वांना देताना पांडुरंग मडकईकर यांनी कळविले की आपल्या मतदारसंघातील सर्वांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सरकारतर्फे देण्यात येणारी लस घेऊन स्वतःला सुरक्षित बनविण्याचे प्रयत्न करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी खूप कष्ट करत आहेत, त्यांना आपण साथ देऊन या महामारीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
खोर्ली आरोग्य केंद्राचे डॉ. केदार रायकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मोहिमेत डॉ. योगेश देसाई तसेच नर्स अर्चना नाईक, सुदिन फडते, सुजाता नाईक यांच्या बरोबरच दत्ता फडते, सत्त्यवान गावडे, शफिर शेख, विश्रांती मोरजकर यांनी ही मोहीम यशस्वी केली. त्यांना संदेश माशेलकर, विश्वास कुट्टीकर, मेघश्याम पर्वतकर, सदानंद भोमकर, सुरज फातर्पेकर, भागी राऊत, दिलीप नाईक यांनी सहकार्य केले.