सेन्सेक्स 41 अंकांनी वधारला- एशियन पेन्ट्स तेजीमध्ये
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिले होते. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 41 अंकांनी वधारुन तर निफ्टी 18 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे. सकाळपासूनच बाजारात दबावाचे वातावरण राहिल्याने काही गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री तर काहींनी खरेदी केल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 0.09 टक्क्यांसह 41.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 48,732.55 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 18.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 14,677.80 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.
निफ्टीमधील एफएमसीजी निर्देशांक वगळता अन्य सर्व क्षेत्रातील निर्देशांकात घसरण राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक घसरणीत धातू, रियल्टी आणि वाहन निर्देशांक राहिले होते. बाजारातील चौफेर विक्रीच्या प्रभावामुळे निफ्टी मिड कॅप निर्देशांक 1.63 टक्के तर स्मॉल कॅप निर्देशांक 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक आठ टक्क्यांनी मजबूत राहिले असून अन्य कंपन्यांपैकी आयटीसी, नेस्ले इंडिया, लार्सन ऍण्ड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, डॉ. रेड्डीज, स्टेट बँक आणि एनटीपीसी यासारख्या प्रमुख समभागात घसरणीचे सत्र राहिले होते.
कोरोना चिंतेचा प्रभाव
कोरोनाची दुसरी लाट ही अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करत असल्याच्या संकेतामुळे जागतिक पातळीवरील बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने सेन्सेक्समध्ये सुधारणा झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. परंतु दुसऱया बाजूला वाढती कोरोना स्थिती ही चिंता वाढविणारी राहणार असल्याचेही काही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.