प्रतिनिधी/ पर्वरी
रामनगर बेती येतील मुस्ताफा (12) या शाळकरी मुलाच्या गालात गेटची सळी आरपार घुसल्या तो गंभीर जखमी होण्याची घटना घडली. घटनेची खबर मिळताच तातडीने पर्वरी पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जावून कटरच्या साहाय्याने गेट कापून मुलाला गेटसह गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले. तेथे उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मुस्ताफा हा संध्याकाळी जवळ असलेल्या मैदानावर खेळायला जात असताना गेटवर चढला, त्यावेळी त्याच हात घसरून पडला व त्याच्या गालात त्या गेटची सळी घुसली. पर्वरी पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर, नारायण मांजी, गौरेश नाईक, महेश माजिक आणि महादेव नाईक यांनी गेट कापण्यासाठी भरपूर मेहनत केली.