खारेबांध-मडगाव येथील घटना
प्रतिनिधी /मडगाव
खारेबांध-मडगाव येथे हॉटेल रविराज समोर असलेले फरशा घालून बंद केलेले गटार ट्रकच्या वजनाने फरशा तुटून ट्रक कोसळण्याचा प्रकार घडला. या ठिकाणी एक कार पार्क केली होती. त्या कारवर ट्रक कोसळल्याने कारची बरीच हानी झाली.
ही घटना काल मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. हा ट्रक बांधकामासाठी वापरण्यात येणाऱया मोठय़ा आकाराच्या विटांनी पूर्ण भरला होता. त्यामुळे त्यात बरेच वजन होते. हा ट्रक मडगावातील हॉटेल रविराजकडे आणून ठेवला होता. त्याखाली फरशा घालून बंद केलेले गटार आहे. ट्रकच्या वजनाने गटाराच्या फरशा तुटल्या आणि ट्रक गटारात गेला. हा ट्रक कलंडल्याने तो बाजूला पार्क केलेल्या कारवर पडला त्यामुळे कारचीही बरीच हानी झाली.
दरम्यान, हा ट्रक मोठय़ा आकाराच्या विटा कुणासाठी घेऊन आला होता. याची चौकशी होणे अत्यंत गरजचे आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी दोन इमारतीच्या मध्ये एक बेकायदा बांधकाम होत असून त्यासाठी या विटा आणल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन इमारतीच्या मागे असलेल्या मोकळय़ा जागेत हे बेकायदा बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
आणखीन अपघात होण्यापूर्वी उपाय योजना आखा
दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी एक नाला आहे. या नाल्यावर फरशा घातल्या असून भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी मडगाव नगरपालिकेने उपाय योजना आखली पाहिजे असे मत माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केले आहे. या ठिकाणी असलेला नाला फार जुना असून त्यावर फरशा घातलेल्या आहेत. या नाल्याच्या ठिकाणी फुटपाथ किंवा दगड घालून या ठिकाणी वाहने पार्क केली जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.