रस्ते दुर्घटनेत झाला होता मृत्यू : आसाममधील घटना
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाम पोलीस विभागाने महिला पोलीस उपनिरीक्षक जूनमोही राभा यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. जूनमोही यांचा एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला होता. जूनमोही यांना एक ‘दबंग’ पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
जूनमोही यांनी नागाव आणि लखीमपूर जिल्ह्यांमध्ये काम केले होते. तर जूनमोही यांच्या मृत्यूशी निगडित गुन्हा नोंदविण्यात आला असून स्थानिक अधिकाऱ्यांची बदली केली जात आहे. सीआयडी टीम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पूर्ण प्रकरणाची समीक्षा करण्यात आली. यानंतर जूनमोही राभा यांच्याशी संबंधित चार प्रकरणांना सीबीआयकडे वर्ग करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे आसामचे पोलीस महासंचालक जी.पी. सिंह यांनी सांगितले आहे.
लेडी सिंघम म्हणून ख्याती मिळविलेल्या 30 वर्षीय जूनमोही राभा यांची कार मंगळवारी कलियाबोर येथील सरुभुगिया गावात एका कंटेनरला धडकली होती. या दुर्घटनेत जूनमोही यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपासा सीबीआयला सोपविण्याचा निर्णय जनतेच्या भावना विचारात घेत घेण्यात आला आहे. जूनमोही यांच्याशी संबंधित 4 पैकी तीन गुन्हे नागाव जिल्ह्यात नोंद आहेत, यातील एक प्रकरण 5 मे रोजी नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी जूनमोही या तपास अधिकाऱ्यांमध्ये सामील होत्या. तर दोन प्रकरणे त्यांच्या मृत्यूशी निगडित आहेत. चौथे प्रकरण जूनमोही यांच्या विरोधात लखीमपूर येथे नोंद आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात दरोडा, जीवे मारण्याची धमकी, ओलीस ठेवणे आणि खंडणीवसुलीचा आरोप करण्यात आला होता. जूनमोही यांचा दुर्घटनेत मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी हा गुन्हा नोंद झाला होता.