सातार्डा गावच्या ग्रामसभेत निर्णय
सातार्डा – प्रतिनिधी
रस्त्यांच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. त्याचा परिणाम गावाच्या विकास कामांवर होत आहे. रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्त्यांच्या कामात अडथळा केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या उत्तम स्टील कंपनीकडून सबसिडी लुटण्याचे प्रकार सुरु आहेत असा आरोप सरपंच संदीप प्रभू यांनी ग्रामसभेत केला.उत्तम स्टील संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी खास ग्रामसभा घेण्याचे निश्चित करण्यात आले.यावेळी सरपंच संदीप प्रभू, उपसरपंच उत्कर्षां पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, दशरथ वेंगुर्लेकर, विनीता गोवेकर, विशाखा पारिपत्ये, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पारिपत्ये, गोविंद राऊळ, पोलीस पाटील विनिता गोवेकर,ग्रामसेवक एस एल राऊळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
तेरेखोल नदीकिनारपट्टीलागत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.घर दुरुस्थी, महात्मा गांधी हायस्कूल इमारत दुरुस्थी, रायाचे पेड खासगी पसंत शाळेच्या छप्पराची दुरुस्थी करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास निधीमधून श्री रवळनाथ मंदिर परिसर विकसित करण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.मुंबार्डेवाडी येथे गणेश विसर्जन ठिकाणी पायऱ्या बांधण्यात याव्यात. सातार्डा – कवठणी जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूने आरोंदेकर यांच्या घराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
रस्त्यांच्या विकास कामांमध्ये अडथळा आणल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच श्री प्रभू यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले जात असल्याने आक्रमक पवित्रा घेतला. पेळपवाडी रस्त्याचे काम चौतीस वर्षानंतर मंजूर झाले आहे. रस्त्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. नंतर तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाहीत – रस्त्याच्या कामाचा दावा ग्रामपंचायतच्या बाजूने झाला आहे.पोलीस संरक्षणात रस्त्याचे काम सुरु करणार असल्याचे सरपंच श्री प्रभू यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.रायाचेपेड येथे खार बंदारा दुरुस्थीसाठी पाच लाख रुपये निधी मंजूर आहे. बंदारा बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठान्ना देण्यात आला आहे.रायाचेपेड – मुंबार्डेवाडी रस्ता दुरुस्थीसाठी जमीनदारांनी बक्षीसपत्र द्यावीत. रखडलेल्या विरंगुळा केंद्रासाठी खनिकर्म विभागाकडून 40 लाख रुपये निधी मंजूर आहे. विरंगुळा केंद्र होण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी संतोष जाधव यांचे अभिनंदन ग्रामसभेत करण्यात आले. ओटवणेवाडी, बांधवाडीत सुरु असलेल्या मंद विज पुरवठ्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.जलजीवन मिशन अंतर्गत भटवाडी येथे विहीर बांधण्यासाठी चर्चा करण्यात आली.तंटामुक समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर प्रभू यांची सलग सहाव्यांदा निवड करण्यात आली.
१५व्या वित्तआयोग निधीमधून 38 लाख रुपये मंजूर आहे.या निधीमधून गावातील विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. उत्तम स्टील कंपनीला उद्योग सुरु करण्यासाठी पुन्हा ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. कंपनी संदर्भात गावाने निर्णय घ्यावा त्यासाठी खास ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी, बेरोजगारांनी ग्रामसभेला उपस्थित राहून उत्तम स्टीलबाबत विचारविनिमय करावा असे आवाहन सरपंच श्री प्रभू यांनी ग्रामसभेत केले.सबसिडी लूटण्याचे प्रकार कंपनीकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पाटोपूलाच्या ठिकाणी मासेविक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांनी मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास वेळप्रसंगी मोकाट गुरांना गोपुरी आश्रमात डांबण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.