महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याहस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोवा प्रदेश भाजपतर्फे पणजीतील जुन्या गोमेकॉ इमारतीत (ईएसजी) त्यांच्या एकंदरित जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी त्याचे उद्घाटन केले. ते जनतेसाठी पाहाण्यास खुले असून राज्यातील इतर ठिकाणीही ते भरवण्यात येणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदी यांचा जीवनप्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. लोकांनी देखील ते पहावे म्हणजे त्यांनाही त्यातून प्रोत्साहन मिळेल. भाजपने व मोदींनी दिलेल्या विविध आश्वासनांची पूर्ती केली असून जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. गोव्यातील अनेक लोकांना त्या योजनांचा लाभ झाल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.
वास्कोचे आमदार दाजी साळकर, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेरात व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोदी प्रदर्शन उद्घाटनास उपस्थित होते. भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मोदींचा वाढदिवस पंधरवडाभर साजरा करण्यात येणार असून त्यात भाजपतर्फे विविध सेवा दिल्या जाणार आहेत. मोदींवर आधारित प्रदर्शन हा त्याचाच एक भाग असून जनतेसाठी देखील हे प्रदर्शन उदबोधक ठरणारे असल्याचे नाईक यांनी नमूद केले.