खेड प्रतिनिधी
भोस्ते घाटातील अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने मासळीची वाहतूक करणारा कंटेनर शेतात उलटून मोठे नुकसान झाले. गेले काही दिवस घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे.
गुजरातमधील वेरावल ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर मासळी घेवून गोवा येथून मुंबईकडे जाताना भोस्ते घाटात ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तो शेतात उलटला. चालकाचा पाय केबिनमध्ये अडकल्याने केनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. भोस्ते घाटात दोनच दिवसापूर्वी एक कंटेनर एसटी बस, दुचाकी व युटीलिटी जीपला धडक देवून संरक्षक भिंतीवर आदळला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा कंटेनरला झालेल्या अपघाताने महामार्गाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.