वनवासमाची येथे घातपाताचा संशय
कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांवरील तणाव काहीसा हलका होत असतानाच शुक्रवारी सकाळी वनवासमाची (ता. कराड जि. सातारा) येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पोलिसांची धावपळ उडाली. महामार्गालगत असलेल्या नाल्यामध्ये मृतदेह सापडल्याने घातपात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मृतदेह हा पुरुषाचा असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील वनवासमाची परिसरात महामार्ग व सेवा रस्त्यामधे असलेल्या नाल्यात शुक्रवारी मृतदेह पडलेला होता.मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तो जाळण्याचा प्रयत्न झाला असावा. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडल्याचे पहाटे व्यायामासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या नजरेस पडला. हा प्रकार समजताच तळबीडचे पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्यासह पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सुत्रे वेगाने हलवली. हा घातपात आहे की अन्य काही प्रकार याचा तपास करण्यात पोलीस गुंतले होते. दरम्यान पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी तीन पथके तयार केली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. मृतदेह स्थानिक कोणाचा आहे की बाहेरून आणत फेकून दिला आहे? हा घातपात आहे की अन्य काही याबाबत पोलीस तपास करत होते. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.