9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी ः कर्नाटकात होणार यंदा निवडणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांची मंगळवारी दिल्लीत पक्ष मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीचे अध्यक्षत्व पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील आगामी 16-17 जानेवारी रोजी होणार आहे. तर राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीत चालू वर्षी होणाऱया विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंबंधी चर्चा झाली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या प्रस्तावावर मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यंदा 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने या बैठकीत याच्या तयारीचा मुद्दा प्रमुख ठरला. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोरममध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे.
2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून यंदा होणऱया विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातील मध्यप्रदेश, कर्नाटक, त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर आहे, तर नागालँड आणि मेघालयात सत्तारुढ आघाडीत भाजपचा समावेश आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँगेसचे सरकार तसेच तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समितीचे सरकार आहे. अधिकाधिक राज्यांमध्ये सत्ता मिळवून पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचमुळे भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत एक प्रस्ताव संमत केला जाणार असून यात भाजप सरकारकडून अलिकडच्या काळात लोकांच्या आर्थिक कल्याणासाठी उचलण्यात आलेल्या पावलांवर चर्चा होणार आहे.