वर्षभरापूर्वीच आईचे निधन, उत्तम कबड्डीपटू
गुहागर वार्ताहर
दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने खांबावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील कर्दे येथे गुरुवारी रात्री 8 वाजता घडली.
निखील संतोष नार्वेकर (24) असे या तरुण वायरमनचे नाव आहे. मूळचा अडूर येथील निखील हा महावितरण कंपनीत 1 वर्षापूर्वी कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता. कर्देत गुरुवारी रात्री अचानक वीज गेल्याने तो दुरुस्तीसाठी गेला होता. तो वीजखांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरु झाल्याने त्याला शॉक लागून तो खांबावरुन खाली पडला व मृत झाला. निखील हा उत्तम कबड्डीपटू होता. रायडर म्हणून त्याची विशेष कामगिरी होती. नुकताच तो महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून रुजू झाला होता. 1 वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. वीज सुरळीत करण्यासाठी त्याला गुरुवारी सायंकाळी फोन आला होता. नुकताच तो शृंगारतळीतून क्रिकेट खेळून कर्दे गावाकडे निघाला होता. वीजखांबावर दुरुस्तीचे काम करत असतानाच विजेच्या धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्दे गावाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निखीलचे संपूर्ण कुटुंबच नियतीने अंधकारमय केले.