बाणस्तारी अपघाताचे ‘अंडर ग्राऊंड कनेक्शन’ : परेशला वाचविण्यासाठी नाटक रचल्याचा संशय
प्रतिनिधी / पणजी
बाणस्तारी पुलावर झालेल्या भीषण अपघात प्रकरणात आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेश निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) काल गुरुवारी गजाआड केले आहे. त्यांच्यासोबत गणेश लमाणी यालाही अटक केली आहे. अपघात झाल्यानंतर मुख्य संशयिताच्या बचावासाठी पोलिसांसमोर दुसराच वाहनचालक संशयित म्हणून उभा केला आणि तक्रारीची पूर्ण दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका पालेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पालेकर यांना अटक केल्यानंतर आता बाणस्तारीतील या बहुचर्चित भीषण अपघात प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे की काय असा संशय निर्माण झाला आहे.
वास्तविक गणेश लमाणी याचा बाणस्तारी अपघात प्रकरणाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही म्हार्दोळ पोलिसांनी गणेश लमाणी याला कुडणे जंक्शनवर जाऊन ताब्यात का घेतले होते? मुख्य संशयित परेश सावर्डेकर याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकरने केलेल्या नाटकात म्हार्दोळ पोलिसांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे की काय? असे प्रश्न आता सीआयडीसमोर उपस्थित झाला आहे.
माजी मंत्र्याच्या घरी रचले बनावटगिरीचे नाटक
रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा बाणस्तारी पुलावर अपघात झाल्यानंतर मुख्य संशयित परेश सावर्डेकर त्वरित घटनास्थळावरुन जवळच राहणाऱ्या माजी मंत्र्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने पालेकर यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. पालेकर माजी मंत्र्याच्या घरी आले आणि परेशच्या बचावासाठी त्यांनी वेगळे नाटक रचले. परेशचा वाहनचालक गणेश लमाणी याला त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्याला मुख्य आरोपी म्हणून तयार करण्यात आले. नंतर पालेकर यांनीच म्हार्दोळ पोलिसांना फोन केला. म्हार्देळ पोलिसस्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे कुडणे जंक्शनवर गेले आणि तेथे त्यांनी गणेश लमाणी याला ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक गावडे अडचणीत
अपघाताबाबत म्हार्दोळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक गावडे त्या ठिकाणी आले नाहीत. खूप उशिराने पेलीस निरीक्षक मोहन गावडे अपघातस्थळी पोचले होते. स्थानिक लोक निरीक्षकांना बोलावण्याची मागणी करत होते, पण ते उशिरा आले. याचाच अर्थ पोलीस निरीक्षक तेवढी वेळ पालेकर यांच्यासोबत कुडणे जंक्शनवर होते की काय, असाही प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात आता म्हार्दोळ पोलिस निरीक्षकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पालेकरही सहभागी होते ओल्या पार्टीत?
अॅड. पालेकर यांना काल गुरुवारी दुपारी सीआयडी पोलिसांनी रायबंदर येथे कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. काही वेळ चौकशी करून नंतर त्यांना अटक करण्यात आली. अपघाताच्या दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने उसगाव येथील फार्ममध्ये जी ‘ओली’ पार्टी झाली होती, त्यात परेश सावर्डेकर कुटुंबीयांसह पालेकर हे सुद्धा सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते सीआयडीच्या हाती लागले. पार्टानंतर परेश सावर्डेकर पत्नी मेघना व मुलांसह मर्सिडीज कारने घरी जात असताना बाणस्तारी पुलावर भीषण अपघात घडवून तिघांचे बळी घेतले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कारमध्ये मद्याच्या बाटल्याही सापडल्या होत्या.
बाणास्तारी अपघात प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिल्यानंतर सीआयडीने अनेकांच्या जबान्या नोंद करून घेतल्या आहेत. सीआयडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली नंतर मुख्य तक्रारीत भादंसं 201, 203, 212, आणि 120 (बी) कलमे जोडण्यात आली आहेत.
तपासाचा शेवट राजकीय सूड घेण्यात होऊ नये : आलेमाव
बाणस्तारी येथील अपघाताचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचचे सर्वात प्राथमिक काम म्हणजे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी योग्य पुरावे गोळा करणे. मात्र क्राईम ब्रँचचे लक्ष सुऊवातीपासूनच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांच्याकडे वळल्याने, तपासाच्या उद्दिष्टावर साशंकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. एकंदर प्रकरण शेवटी राजकीय सूड घेण्यात बदलू नये. खऱ्या आरोपींना सजा देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या राजकीय विरोधकांना शिक्षा देण्यासाठी तपास यंत्रणांनी प्राधान्य देऊ नये, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
पालेकरांच्या अटकेमागे राजकीय खेळी : सरदेसाई
बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांनी आपचे गोवा प्रदेश निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांना केलेल्या अटकेबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी या अटकेमागे राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. अटकेमागील कारणाभोवती संशयाची दाट छाया आहे. अपघाताच्या घटनेनंतर बराच वेळ लोटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उशिरा झालेल्या कारवाईने गैरसमज वाढवले आहेत. विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना निवडकपणे लक्ष्य केले जात आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.