स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई : एकूण पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त: चार दिवसाची पोलीस कोठडी
सांगली प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील बुधगाव येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप आनंदा निकम (31, रा. सृष्टी बंगला, नम्रता कॉलनी, बुधगाव) याला दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुस एक चाकू, एक तलवार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी गाडीसहीत पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधगाव येथील एक युवक गावठी पिस्तल बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या परिसरात तपासणी मोहीम राबविली होती. त्यावेळी एका चारचाकी गाडीला अडविण्यात आल्यानंतर या गाडीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये एक चाकू, एक तलवार आणि लपविण्यात आलेल्या दोन गावठी पिस्टल तसेच पाच जिवंत काडतूस आढळून आली. ही गावठी कट्टे कोठून आणले आहेत याची विचारणा केली असता, या गाडीचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याने गावठी कट्टे कोठून आणले. तसेच ते बाळगण्याचा कोणता उद्देश होता याची माहिती दिली नाही. त्यामुळे त्याच्याविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली. दोन गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतूस, चाकू, तलवार आणि चारचाकी गाडी असा एकूण तीन लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता,
न्यायालयाने त्याला चारदिवसांची कोठडी दिली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरिक्षक किरण मगदूम, मेघराज रूपनर, चेतन महाजन, हेमंत ओमासे, अरूण अवताडे, सचिन धोत्रे यांनी पार पाडली.