मोपा विमानतळ उद्घाटनाला पंतप्रधान येणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
भारतात होणाऱया जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेतील एक कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असून त्यानुसार तो कार्यक्रम राज्यात होणार आहे. तसेच येत्या 15 ऑगस्ट रोजी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असून पंतप्रधान त्यासाठी उपस्थित रहातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पर्यटन खात्याच्या ऑनलाईन सेवांकरीता वेबसाईटचा शुभारंभ केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की जी-20 ही आंतरराष्ट्रीय परिषद देशात होणार असून गोव्यातील पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी त्यातील एक कार्यक्रम राज्यात आखण्यात यावा अशी मागणी मोदींकडे करण्यात आली असून एखादा कार्यक्रम गोव्यात होणार असल्याचा विश्वास डॉ. सावंत यांनी प्रकट केला.
गोव्यात सर्व प्रकारच्या पर्यटनास उभारी देण्याचा प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त पर्यटक गोव्यात यावेत यासाठी शनिवार-रविवारी विशेष पर्यटन सेवा (विकेंड) सुरू करण्याची सूचना त्यांनी केली आहे. शनिवार -रविवार असे दोन दिवसांसाठी येणारे पर्यटक खुप असतात. त्यांना सेवा देण्याकरीता सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले.