वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडसरनच्या नावावर एक नवा विक्रम नोंद झाला असून आयसीसी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये अग्रस्थान मिळविणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत या 40 वर्षीय गोलंदाजाने पुन्हा एकदा अग्रस्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वी कसोटी मानांकनात अग्रस्थान मिळविणारा सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर क्लॅरी ग्रिमेट (1936) यांची नोंद झाली होती.
आजवरच्या कारकिर्दीत त्याने एकूण सहाव्यांदा अग्रस्थान मिळविले आहे. 40 वर्षे 207 दिवस वय असणाऱया अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला मागे टाकत अग्रस्थान मिळविले आहे. वेगवान गोलंदाजात अँडरसनने इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा सर्वाधिक कसोटी बळी मिळविले आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडवर 267 धावांनी दणदणीत विजय मिळविला, त्यात अँडरसनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या 11 कसोटीतील इंग्लंडचा हा 10 वा विजय होता. या सामन्यात त्याने एकूण 7 बळी मिळविले असून त्याची एकंदर बळींची संख्या 682 झाली आहे. 2003 मधील पहिल्या मालिकेनंतर त्याने यावेळी प्रथमच 26 च्या खाली सरासरी राखली आहे. वयाचा त्याच्या कामगिरीवर काहीही परिणाम होत नाही, हेच आतापर्यंत दिसून आले असून 35 व्या वर्षी त्याने 56 कसोटीत 202 बळी मिळविले होते. त्यावेळी त्याची सरासरी 20.56 धावांची होती. अँडसरनची स्टुअर्ट ब्रॉडबरोबर जोडी जमली असून या दोघांनी एकत्र खेळताना 113 कसोटीत 1009 बळी मिळविले आहेत. याआधी ग्लेन मॅकग्रा व शेन वॉर्न यांनी 1001 बळी नोंदवत विक्रम नोंदवला होता.