स्व. जयकृष्ण शिरोडकर ’सहकार रत्न’ भंडारी क्रेडिट सोसायटी ’आदर्श सहकारी संस्था’
प्रतिनिधी /पणजी
सहकाराच्या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सहकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सहकार रत्न, सहकार भूषण आणि सहकार श्री अशा तीन वर्गात वैयक्तिक आणि आदर्श सहकारी संस्थांसाठी तीन अन्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
शुक्रवारी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी या पुरस्कारांसंबंधी माहिती दिली. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई आणि सहकार निबंधक विशांत गावणेकर यांचीही उपस्थिती होती. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 रोजी शिरोडा येथे आयोजित सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शिरोडा येथील कदंब बसस्थानकावर सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या सोहळ्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे शिरोडकर यांनी सांगितले.
वर्ष 1963 पासून राज्यात सहकार चळवळीस प्रारंभ झाला. त्यानंतरच्या काळात या क्षेत्रात अनेक महनीय व्यक्तींनी उल्लेखनीय योगदान देऊन सहकाराला वेगळ्या उंचीवर पोहोचविले आहे. त्यामुळेच आज सुमारे 2552 सहकारी संस्था राज्यात कार्यरत आहेत. त्या संस्थांशी सुमारे 15 लाख सदस्य जोडले गेले आहेत, असे शिरोडकर यांनी सांगितले.
अशा या क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्यांच्या कार्याची पावती म्हणून किंवा त्यांच्या कार्यातून इतरांनीही आदर्श घ्यावा या भावनेतून 2001 पासून सरकारी पातळीवर सहकार पुरस्कार देण्यास प्रारंभ करण्यात आला. कोरोनामुळे गत दोन वर्षे हा सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. यंदा 2021-22 वर्षासाठीचे पुरस्कार देण्यात येणार असून त्यातील सहकार रत्न हा पुरस्कार जयकृष्ण शिरोडकर यांना (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार आहे. अन्य दोन पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये कवळे फोंडा येथील श्रीकांत नाईक आणि गावठण प्रियोळ येथील दामोदर नाईक यांचा समावेश आहे. त्यांना अनुक्रमे सहकार भूषण आणि सहकार श्री या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या तिन्ही पुरस्कारांतर्गत अनुक्रमे ऊ. 1 लाख, ऊ. 75 हजार आणि ऊ. 50 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
त्याशिवाय आदर्श सहकारी सोसायटी म्हणून भंडारी सहकारी क्रेडिट सोसायटीला पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर बिचोलीम मर्चंटस् अर्बन क्रेडिट सोसायटी-डिचोली आणि सुवर्णलक्ष्मी सहकारी पतपेढी मर्यादित-कोंब मडगाव, यांना उत्तेजनार्थ, पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याशिवाय सांगे येथील प्रकाश लोलू नाईक आणि करासवाडा म्हापसा येथील गोवा महिला सेल्फ हेल्प ग्रूपच्या हेमाश्री गडेकर यांच्याही कार्याची दखल घेऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती श्री. शिरोडकर यांनी दिली.