पोलिसांनी अठराजणांच्या आवळल्या मुसक्या :, दहा लाखांचे 29 मोबाईल, दुचाकी जप्त
प्रतिनिधी /पणजी
कळंगूट पोलिसांनी बुधवारी मोबाईल चोरटय़ांच्या विरोधात केलेल्या कारवाईनंतर गुरुवारी रात्री हणजूण पोलिसांनी कारवाई करून आणखी एका मोबाईल चोरटय़ा टोळीचा पर्दाफाश करत 18 मोबाईल चोरटय़ांना अटक केली असून संशयितांकडून 10 लाख रुपये किमंतीचे 29 मोबाईल जप्त केले आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. कळंगूट पोलिसांनीही गुरुवारी दुसऱयांदा केलेल्या कारवाईत पाच संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 9 मोबाईल तसेच सोनसाखळीचे तुकडे मिळून पाच लाखाचा ऐवज जप्त केला असल्याचे वाल्सन यांनी सांगितले.
पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक निधीन वाल्सन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी जीवबा दळवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
अटक केलेल्या संशयितांमध्ये अमीन मोबीन खान (32 मुंबई), प्रमोद पुजारी (26 उस्मानाबाद), झमान अजीम खान (27 ठाणे मुंबई), अरबाज फिरोझ येलूकर (26 ठाणे मुंबई), फारूक सालेहमोहद अरबानी (35 ठाणे), अदील अब्दूल सत्तार (25 ठाणे), अब्दूल लतीफ खान (38 मुंबई), इम्रान मोहद (28 मुंबई), करण विजय तेलकर (21 मुंबई), युसूफ अब्दूल शेख (28 मुंबई), मोहम्मद अफताब कुरेशी (23 ठाणे), सोहील शेख (35 ठाणे), महम्मद शेख (25 ठाणे), शारूख फारूख शेख (23 ठाणे), अझम रफीक सय्यद (24 ठाणे), अलीम फाईम सय्यद (29 मुंबई), अवाईस समीर शेख (25 ठाणे) इम्रान मीरझा (38 मुंबई)
महाराष्ट्रातून आल्या चोरटय़ांच्या टोळय़ा
राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी किनारी भागात जंगी पाटर्य़ांचे आयोजन केले जात आहे. सनबर्न पार्टीही त्याचाच एक भाग आहे. पर्यटकांबरोबर चोरटेही गोव्यात आले आहेत. हणजूण पोलिसांनी सनबर्न पार्टीच्या ठिकाणी दोन चोरटय़ांना मोबाईल चोरताना रंगेहात अटक केली, त्यानंतर त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडून इतर 16 चोरटय़ांची माहिती मिळाली. ही टोळी महाराष्ट्रातून आली असून बागा येथील एका हॉटेलमध्ये तीन दिवस राहिले होते. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. त्या दुचाकीही चोरीच्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
कळंगुट पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत 12 संशयितांना अटक करून 30 लाख रुपये किंमतीचे 41 मोबाईल जप्त केले. तसेच देन महागडय़ा कारही जप्त केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा कळंगुट पोलिसांनी दुसऱयांदा कारवाई करून पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून 9 मोबाईल तसेच सोनसाखळीचे तुकडे मिळून 5 लाख रुपये किमंतीचा ऐवज जप्त केला आहे. कळंगुट पोलिसांनी गुरुवारी अटक केलेल्या संशय़ितांमध्ये राम सौमिक, अनिल राजू राठवड, संजू सिंग, सनी शाहू व योगेश सूरत यांचा समावेश आहे.
गेल्या दोन दिवसांत हणजूण व कळंगूट पोलासनी केलेल्या कारवाईत एकूण 35 चोरटय़ांना अटक केली असून 45 लाख रुपये किमंतीचे 80 मोबाईल जप्त केले आहेत. किनारी भागात चोरटय़ांवर नजर ठेवण्यासाठी खास पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.