गोवा प्रभारी आतिशी यांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
आप पक्ष हा फक्त निवडणूक लढविण्यापुरता मर्यादित नसून गोमंतकीयांचा आवाज आहे. आतापर्यंत आपने गोमंतकीयांच्या समस्या, विषय मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूकीत उतरणार असून उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हय़ासाठी उमेदवार उभे करणार आहे. याचबरोबर आपल्या प्रवासाच्या नवीन टप्प्यासाठी तयारी करत असताना जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापित करण्यात आली असून आम आदमी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती केली असून कार्यकारी अध्यक्षपदी बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस आणि वेळ्ळीचे आमदार क्रूझ डिसिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपच्या गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी आज पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अमित पालेकर, प्रतिमा कुतिन्हो, आपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक, वाल्मिकी नाईक उपस्थित होते.
उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि ऍड. सुरेल तिळवे, प्रा. रामराव वाघ, सेसिल रॉड्रीगीस, संदेश तेलेकर, पेट्रेशिया फर्नांडिस. संघटनसचिव ः राजेश कळंगूटकर, रितेश चोडणकर, गेर्सन गोम्स, प्रेमानंद (बाबू) नानोस्कर, सरचिटणीस (आघाडी संघटना)ः उपेंद्र गावकर, सरचिटणीस (प्रचार आणि संवाद) फ्रान्सिस कोएल्हो, महिला प्रदेशाध्यक्षपदी ऍड. प्रतिमा कुतिन्हो, एसटी शाखा अध्यक्ष ः अनिल गावकर, युवक संघाचे अध्यक्ष ः ऍड. अनुप कुडतरकर, अल्पसंख्याक शाखा अध्यक्ष ः जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्याक शाखा उपाध्यक्ष ः सरफराज अंकलगी, कायदेशीर प्रकरणे पाहण्यासाठी ऍड. प्रसाद शहापूरकर, ऍड. सुनील लोरण, ऍड. विष्णू नाईक, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहसचिव (संघटन) ः प्रशांत नाईक, लिंकन वाझ, रॉक मास्करेन्हास, रोशनी गवस, महेश साताळकर, उदय साळकर, अभिजित देसाई, मारियो कॉर्डेरो, सहसचिव(समन्वय) डॉ. विभास नेरी फर्नांडिस, मीडीया टीम ः मुख्य प्रवक्ता म्हणून राजदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय महादेव नाईक, वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे, प्रतिमा कुतिन्हो, एलिना साल्ढाणा, रामराव वाघ, सेसिल रॉड्रीगीस, सिद्धेश भगत. माध्यम प्रभारी ः सुचिता नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आतिशी यांनी यावेळी जाहीर केले. आप गोवा प्रचार समिती ः अध्यक्ष ः महादेव नाईक, उपाध्यक्ष ः एलिना साल्ढाणा.
या कार्यकारिणीसोबतच प्रचार कार्यकारिणीही स्थापित करण्यात येत असून आगामी पंचायत, लोकसभा, जिल्हा पंचायत निवडणूकीच्या प्रचाराची धुरा आपचे ज्येष्ठ नेते महादेव नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली असून उपाध्यक्षपदी एलिना साल्ढाणा असतील. महादेव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील इतर कार्यकारिणीची लवकरच घोषणा होईल अशी माहिती आतिशी यांनी दिली.
आम आदमी पक्ष तळागळात कार्य करणारी नवीन संघटना बनविण्यासाठी प्रारंभ करत आहे. 2022 विधानसभा निवडणूकीत गोमंतकीय आमच्या विश्वास ठेवून आपच्या दोन उमेदवारांना निवडून आणले. अशाप्रकारे आम आदमी पक्ष नागरिकांसाठी कार्य करत राहील, त्यांच्या समस्या, विषय मांडेल. 2027 होणाऱया विधानसभा निवडणूकीत गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार असेल. आगामी पाच वर्षांसाठी आणि सरकार बनविण्यासाठी आतापासूनच आप कार्य करायला सुरूवात करणार आहे.
मागील पाच दहा वर्षापासून आम आदमी पक्ष हा एक प्रखर विरोधक म्हणून भूमिका साकारत आहे. विविध स्तरावरील विषय पक्षाने मांडले आहेत. आज आपचे दोन आमदार निवडून आले आहेत. गोमंतकीयांच्या विचारांचा आवाज पक्ष बनणार आहे. पक्ष पुढे नेऊन तळागाळात जाऊन नवीन संघटना, नवीन कार्यकर्ते, नव्या रूपात आम आदमी पक्ष प्रखर आवाज बनून उभी राहणार असल्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले.
निवडणूक संपून दोन महिनेच झाले असून आप पक्षाने पुढील प्रवासाच्या टप्प्याला सुरूवात केली आहे. पुढील पाच वर्षात आपचे कार्य तळागळात पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय जे ज्वलंत विषय आहेत ते विधानसभा अधिवेशनात दोनही आमदार मांडणार. आगामी काळात आम आदमी पक्षाला सत्तेत आणण्याचा पूर्ण प्रयत्न असेल असे महादेव नाईक यांनी सांगितले.
राज्यभरातील महिलांकडे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. आम आदमी पक्ष हा महिलांचा आवाज ठरेल असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. केजरीवाल मॉडेल जेव्हा गोव्यात येईल तेव्हा गोमंतकीयांची स्वप्ने पूर्ण होतील. गोमंतकीयांनाही उत्तम शिक्षण, नोकरी, स्वास्थ्य, व इतर सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी गोमंतकीय आप पक्षाला नक्कीच पाठिंबा देईल असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. आम आदमी पक्ष हा सामान्यांचा आवाज बनेल. याशिवाय गोव्यात आपचे सरकार स्थापित करण्यासाठी प्रयत्न करू असे राजदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.
पंचायत निवडणूक अजून जाहीर करण्यात आली नसून 18 जूनच्या आसपास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु घोषित केल्यानंतर पंचायत निवडणूकीसाठी योग्य उमेदवार असेल त्याला पाठिंबा देऊ असे महादेव नाईक यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष हा प्रत्येक समाजाचे विषय समोर आणत राहिला आहे. गोव्यातील कुठलाही समाज असो त्यांना प्रतिनिधीत्त्व मिळाले नाही. गोव्याला अशा प्रगतशील आणि समाजाच्या शेवटच्या घटकाबद्दल विचार करणाऱया पक्षाची गरज असून आम आदमी पक्षाने गोमंतकीय समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे असे आतिशी यांनी सांगितले.