पाचगणी / प्रतिनिधी :
मी भाजपचा आमदार असलो तरी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मला विकासकामांसाठी सातत्याने मदत केली जाते. आताही त्यांनी जावली तालुक्याच्या विकासासाठी मला पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत तालुक्याचा विकास होणार नाही असे सांगून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या विरोधकांना ही चांगली चपराक आहे, अशी परखड प्रतिक्रिया जावलीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinghraje bhosale) यांनी व्यक्त केली.
सरताळे तालुका जावली येथे विकास सेवा सोसायटीच्या निवडून आलेल्या संचालकांच्या सत्कार याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. ते म्हणाले, जावळी तालुक्यातील पावसाळय़ात खराब झालेला रस्त्याची कैफियत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली आणि मी भाजप मध्ये असताना देखील अजित पवार यांनी जावलीच्या पावसाळय़ातील दुरावस्था झालेला रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला. हे तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. विकास कामे करत असताना पक्षापेक्षा सर्वसामान्य जनतेची कामे महत्त्वाचे असतात हे डोळय़ासमोर ठेवून आजपर्यंत भाऊसाहेब महाराजांच्या आचार आणि विचार यांना डोळय़ासमोर ठेवून माझ्यासारखा आमदार सातारा जावळीत काम करत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या दौऱयासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष करून मी जिथे उपस्थित नव्हतो त्या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करून माझ्या कार्याचे कैतुक केले हे माझ्यासाठी खूप मोठे आहे.
माझ्या कार्याची पोचपावती मला जनतेतून मिळते. कोण मुंबईवरून येऊन इथं दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्यालाही सर्वसामान्य जनता उत्तर देईल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच अशा प्रवृत्तींकडे लक्ष देऊ नका. कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, असा विश्वासही शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला. यावेळी जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौरभ शिंदे, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक हिंदुराव तरडे, जयदीप शिंदे, समीर आतार, बंडा पवार, सुनील भिसे आदी उपस्थित होते.