कुठल्याच नेत्याला भेटायचे नाही
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेशच्या सीतापूर तुरुंगात कैद समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची भेट घेण्यास नकार दिला आहे. अजय राय हे गुरुवारी आझम यांची तुरुंगात भेट घेणार होते, परंतु आझम यांनी कुठल्याही राजकीय नेत्याची भेट घेण्याची इच्छा नसल्याचे कळविले आहे. अब्दुल्ला यांच्या बनावट जन्म प्रमाणपत्राप्रकरणी आझम खान, त्यांच्या पत्नी आणि अब्दुल्ला हे प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. 2017 मधील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अब्दुल्ला यांनी स्वत:चे वय वाढवून दाखविले होते. आझम खान यांनी स्वत:च्या प्रभावाचा वापर करत अब्दुल्लाचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करविले होते. याप्रकरणी न्यायालयाने आझम खान, त्यांच्या पत्नी तंजीन फातमा आणि पुत्र अब्दुल्लाला दोषी ठरविले हेते. काँग्रेस नेते अजय राय यांनी आझम खान यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप करत भाजप सरकारला लक्ष्य केले होते. आझम खान यांचे कुटुंब संकटात असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात जाणार असल्याचे राय यांनी म्हटले होते.