ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनानिमित्त शोकसभा : विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली
प्रतिनिधी /बेळगाव
सिंधुदुर्ग सोसायटीसह विविध संस्थांचे संस्थापक संचालक असलेले, निःस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ट कार्यकर्त्यास मुकले, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड. मुकुंद परब यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी आदर्श सोसायटीचे चेअरमन दिगंबर राऊळ व व्यासपीठावरील सर्वांनी ऍड. मुकुंदराव परब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी प्रास्ताविक केले. सिंधुदुर्ग सोसायटीचे मार्गदर्शक महादेव सावंत म्हणाले की, मुकुंदराव अचानक निघून गेल्याने आम्ही एका मार्गदर्शकास मुकलो आहोत. आमच्या सोसायटीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आदर्श सोसायटीचे चेअरमन दिगंबर राउळ म्हणाले, ते निघून गेले यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आदर्श सोसायटी व मुक्तांगण विद्यालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने आम्ही एका ज्येष्ट मार्गदर्शकास मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने आमची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब म्हणाले, दादांच्याबद्दल प्रत्येक जण ते एक निःस्वार्थी, प्रामाणिक व संयमी व्यक्ती होते. त्यांच्यापासूनच आम्हाला निःस्वार्थीपणे व त्यागी वृत्तीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. सिंधुदुर्ग रहिवासी संघ गावडे गुरुजी व आर. के. सावंत यांच्या सहकार्याने दादांनी सुरू केला. त्यामुळेच आम्ही सिंधुदुर्गातील कार्यकर्ते इथे एकत्र येऊन काम करीत आहोत, असे सांगितले.
एक निष्णात वकील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठे कार्य केलेल्या परब यांना बेळगावकर कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दात धनश्री सोसायटीचे संस्थापक कॅप्टन कानडीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, एक शांत, संयमी व कायम हसतमुख राहणाऱया व्यक्तीस आपण मुकलो आहोत. मराठी वकिलांची संघटना स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले, मुकुंदराव हे समितीचे ज्ये÷ कार्यकर्ते होते. वकिली पेशापेक्षा म. ए. समितीच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आपला अधिक वेळ दिला.
यावेळी वसंत दांडेकर, ईश्वर लगाडे, सविता जे. के. यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी, आदर्श सोसायटी व सिंधुदुर्ग सोसायटीचे सर्व संचालक, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते बी. ए. येतोजी यांच्यासह मुक्तांगणचा शिक्षकवर्ग, वकीलवर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते.