फरार नेत्याची 6 दुकाने जमीनदोस्त केली जाणार
वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील एका सोसायटीत महिलेशी गैरवर्तन करणाऱया श्रीकांत त्यागी विरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. त्यागीचे अवैध बांधकाम प्रशासनाने बुलडोझरद्वारे जमीनदोस्त केले आहे. यापूर्वी रविवारी रात्री त्यागीच्या 15 गुंडांनी सोसायटीत पोहोचून लोकांवर दगडफेक तसेच मारहाण केली होती. त्यागीला अटक करण्यासाठी एसटीएफ तसेच पोलिसांची 12 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
त्यागीच्या 7 दुकानांवर जीएसटी अधिकाऱयांनी छापा टाकत दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्या विरोधात 25 हजार रुपयांचे इनाम घोषित केले आहे. तर त्याच्या महिला जोडीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीकांत त्यागीने सूरजपूर न्यायालयात शरणागतीचा अर्ज केला असून न्यायालयाने याकरता 10 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.
श्रीकांत त्यागीला राज्य सरकारमधील एक मंत्री तसेच माजी मंत्र्याचे संरक्षण मिळाले होते असा आरोप होत आहे. पोलिसांना त्यागीचा अखेरचे लोकेशन हरिद्वार आणि ऋषिकेश दरम्यान आढळून आले आहे. त्याचा मोबाइल फोन वारंवार ऑन-ऑफ होत आहे. हरिद्वार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱयात तो कैद झाला आहे. त्यागीकडून सोसायटीत गैरवर्तन करण्यात आल्यावर स्थानिक पोलिसांनी घेतलेली भूमिका वादात सापडली होती. याप्रकरणी पोलीस स्थानक प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून श्रीकांत त्यागी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधात दिल्ली, उत्तराखंड अन् उत्तरप्रदेशात छापे टाकले आहेत.