हॉकी इंडिया लोगो/ वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतूने हॉकी इंडियाने या हॉकीपटूंसाठी रोख रकमेची बक्षीसे देण्याची घोषणा केली आहे. रविवारी झालेल्या हॉकी इंडियाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये हा नवा निर्णय जाहीर करण्यात आला. आता या निर्णयामुळे भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंना प्रत्येक वर्षी ठराविक रक्कमेचा लाभांश मिळणार आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग हे उपस्थित होते. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करत विजेतेपद मिळवणाऱया भारतीय पुरुष आणि महिला संघातील हॉकीपटूंना प्रत्येकी 50 हजार रुपये तर या संघांना मार्गदर्शन करणाऱया प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस हॉकी इंडियातर्फे दिले जाईल, असे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितले. सध्या देशातील काही हॉकीपटूंची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या निर्णयाचा लाभ त्यांना निश्चितच मिळेल.
अलीकडेच झालेल्या दहाव्या सुलतान जोहोर चषक कनिष्ठांच्या पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱया भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एका आठवडय़ापूर्वी हॉकी इंडियाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या संघाला मार्गदर्शन करणाऱया प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी अलीकडच्या कालावधीत समाधानकारक होत असल्याने त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्याकडून सरस कामगिरी व्हावी या हेतूने हॉकी इंडियाने वरील निर्णय घेतला आहे.
नेदरलँडस्चा फलंदाज स्टीफन मायबर्ग निवृत्त