सुरक्षा दलांनी प्रथमच हेरॉन ड्रोनमधून उडवले ग्रेनेड
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील अनंतनागमध्ये रविवार, 17 सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशीही चकमक सुरूच आहे. गडुल कोकरनागच्या जंगलात आणखी दोन दहशतवादी लपल्याची भीती लष्कराला आहे. शनिवारी लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. रात्री अंधार पडल्याने कारवाई थांबवण्यात आल्यानंतर रविवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रथमच लष्कराने कोकरनागमध्ये हल्ल्यासाठी आपले सर्वात प्रगत ड्रोन हेरॉन मार्क-2 लाँच केले. ड्रोनने दहशतवाद्याला शोधून त्याच्यावर ग्रेनेड डागले. यात संबंधित दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. चकमकीदरम्यान मुसळधार पावसातही हेरॉन काम करत राहिला. याशिवाय क्वाड कॉप्टर ड्रोनने दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यात मदत केली. हे ड्रोन एकाचवेळी पाच बाजूंनी गोळ्या आणि ग्रेनेड डागू शकते. तसेच 15 किलोमीटर अंतरापर्यंत बिनचूक मारा करण्याची त्याची क्षमता आहे.
बारामुल्लामधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) उरी सेक्टरमध्ये शनिवारी तीन दहशतवादी मारले गेले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. तर तिसऱ्याचा मृतदेह सीमेजवळ पडल्यामुळे तत्काळ हस्तगत करण्यात आला नव्हता. पाकिस्तानी हद्दीतून होणाऱ्या गोळीबारामुळे भारतीय लष्कराने सावध पवित्रा घेतला होता. या घुसखोरीसाठी पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत आणि संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.