वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम (ब्रिटन)
28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान येथे होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेची क्वीन्स बॅटन रिलेचे या स्पर्धेला एक आठवडा बाकी असताना येथे आगमन झाले. राष्ट्रकुल स्पर्धा क्वीन्स बॅटन रॅलीचा 294 दिवसांचा प्रवास आयोजित केला होता आणि आता या प्रवासातील शेवटचे दोन दिवस बाकी असताना बुधवारी बर्मिंगहम शहरामध्ये या बॅटन रिलेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद बर्मिंगहम शहराला लाभले आहे. क्वीन्स बॅटन रिले आता या शहरातील सर्व म्हणजे 10 संसदेच्या मतदारसंघांना भेट देणार आहे. क्वीन्स बॅटन स्थानिक शेकडो प्रमुख व्यक्ती हाताळणार आहेत. क्वीन्स बॅटन हाताळण्याची संधी आयुष्यात क्वचितच एकदा मिळत असते.
बुधवारी क्विन्स बॅटन रिलेचे बर्मिंगहममध्ये आगमन झाल्यानंतर या बॅटनने शहरातील बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. या बॅटन रॅलीच्या प्रवासाचा शेवटचा दिवस गुरुवार राहील. गुरुवारी सकाळी या रिले प्रवासाला बर्मिंगहम लहान मुलांच्या हॉस्पिटलपासून प्रारंभ होणार आहे. या रिले प्रवासाची सांगता ऍस्टोन हॉलमध्ये होणार आहे. या हॉलमध्ये ही बॅटन दुपारी 12 ते 4 या दरम्यान ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ही बॅटन अलेक्सझांडेर स्टेडियममध्ये गुरुवारी सायंकाळी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी दाखल होईल.