फळसकाटा-मोले येथील निवासस्थानाला भेट
प्रतिनिधी /धारबांदोडा
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सेव्ह मोले या पर्यावरणीय आंदोलनात विशेष योगदान दिलेले फळसकाटा-मोले येथील कृष्णा झोरे या तरुणाचा सन्मान केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोले येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या अमित पाटकर यांनी कृष्णा झोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कृष्णा यांचे वडील चंद्रकांत व आई सावित्री झोरे या उपस्थित होत्या. कृष्णा झोरे हे उच्च शिक्षित असून त्यांनी एरोनोटिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय बंगळूर येथील इंडियन इन्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून वायू आकाश अभियांत्रिकीची एमई पदवी संपादन केली आहे. सध्या ते पुणे येथे नोकरीला आहेत.
कृष्णा झोरे यांचे धाकटे बंधू तुकाराम झोरे हेही उच्च शिक्षित असून त्यांनी मॅकनिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर हवामान विज्ञान शाखेतून एमई पदवी संपादन केली आहे. भुवनेश्वर येथील आयआयटीमधून ते सध्या हवामान विज्ञान विषयात पीएचडी करीत आहेत. चंद्रकांत झोरे यांचे दोन्ही पुत्र आयआयटी उच्च शिक्षित असल्याचे कळताच अमित पाटकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. फळसकाटासारख्या ग्रामीण भागात राहून सामान्य कुटुंबतील दोन मुले आयआयटीपर्यंत झेप घेतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण त्यांच्या या कार्यतून प्रभावित झालो असून गोव्यातील विद्यार्थ्यांना कृष्णा झोरेसारख्या उच्चशिक्षिताकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. चंद्रकांत झोरे हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांच्या पत्नी सावित्री झोरे या गृहिणी आहेत.