कोरोना रूग्णांची खाट तब्बल अडीच तास सेनिटायझविना
फोंडा : देशात काल सोमवारी एकाच दिवशी नवीन 500 कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याची घटना ताजी असतानाच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात मात्र कोविड सुरक्षतेविषयी रामभरोसे धोरण अवलंबविल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्वरीत त्याचे साहित्य सेनिटायझ करणे सोडूत तब्बल दोन अडीच तास त्याच अवस्थेत ठेवून इतर रूग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फोंडा येथील उपजिल्हा ईस्पितळात उपचार घेत असलेल्या एका रूग्णांचा कोरोना अहवाल काल दुपारच्या सुमारास पोझिटीव्ह आला. त्याला तात्काळ बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सदर घटना दुपारी 3 वा. सुमारास उघडकीस आली होती. तो रूग्ण उपचार घेत असलेल्या वार्डात सुमारे 20 इतर कारणासाठी रूग्ण उपचार घेत असल्याने त्याना लागण होऊ नये यासाठी कोरानाबाधिताला विलगीकरणात बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र तो ज्या बेडवर झोपला होता त्याची बेडशिट, त्याचे कपडे, सलाईन तब्बल दोन तास त्याच स्थितीत असल्याने रूग्णामध्ये चलबिचल सुरू झाली. येथील पारिचारिकांच्या धाकामुळे कोणत्याच रूग्णाने यासंबंधी तक्रार केली नाही.
सदर वृत्त सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर घेतली दखल
सदर वृत्त सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर मल्टीटास्क कर्मचाऱ्याने बॅडशिट व इतर साहित्य काढून नेले खाट सेनिटायझ केली. तोपर्यत कित्येकजण त्या खाटीच्या संपर्कात आले होते. वाढत्या कोरोना रूग्णाच्या धर्तीवर कोरोना पोझिटीव्ह रूग्ण सापडल्यानंतर कोराना मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यात येणे बंधनकार कर असते. मात्र येथील मल्टिटास्क कर्मचाऱ्याला डॉक्टर कोणतेच आदेश देत नाहीत की ते त्याचे आज्ञा पाळत नाही हाच मोठा प्रश्न आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी काही रूग्णांनी केली आहे.