पहिल्या दिवसापासून भाविकांचा वाढता ओघ : महामार्गावर वाहन पार्किंगचा ताण, अपघातांचा धोका
वास्को : झुआरीनगर सांकवाळ पठारावरील प्रेक्षणीय स्थळ बनलेल्या बीर्ला मंदीराकडे भाविकांचा ओघ वाढल्याने समोरच्या महामार्गावर वाहतुक आणि पार्किंगचा जबरदस्त ताण पडत असून रोड क्रॉसिंगचे प्रकार वाढल्याने अपघातांचा धोका संभवत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांचे दाट पार्किंग व त्यातून होणारी वाहतुक आणि रस्ता पार करण्यासाठीची खटपट धोकादायक ठरलेली आहे.
मागच्या महिन्यात सांकवाळ पठारावरील बिर्ला मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्यापासून या मंदिराकडे सबंध गोव्यातील लोकांचा ओघ वाढला आहे. राधा कृष्णाचे बीर्ला मंदिर गोव्यातील एक प्रेक्षणीय स्थळ बनलेले आहे. स्थानिक लोकांपेक्षा गोव्यातील विविध भागातील लोकांची या स्थळावर प्रचंड गर्दी असते. शनिवार व रविवारच्या दिवसांत या गर्दीत वाढ होत असते. शालेय सुट्ट्यांच्यानिमित्तानेही गर्दी वाढली. पर्यटकांच्या गाड्या, बसगाड्या या मंदिराकडे जाण्यासाठी महामार्गावरच थांबतात. दक्षिण व उत्तर गोव्यातून येणारी वाहने वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर थांबतात. मंदिराबाहेर पार्किंगसाठी फारशी जागा नाही. मोठ्या संख्येने येणारे लोक व त्यांची वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी सुविधा या स्थळावर नसल्याने या वाहनांचा सारा ताण मंदिर आणि बिटस् पिलानीसमोरील महामार्गावरच पडत आहे. संध्याकाळी आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चिक्कार वाहने या महामार्गाच्या दोन्ही बाजुला पार्क केलेली असतात. वास्कोच्या दिशेने झरीनपर्यंत तर वेर्णाच्या दिशेने झेडआयओटीएलच्या नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मंदिर नवीनच असल्याने तसेच प्रेक्षणीय पर्यटन स्थळ उपलब्ध झाल्याने ही गर्दी पडत असून वाहने पार्किग, भरधाव होणारी वाहतुक आणि लोकांचे रस्ता पार करणे धोकादायक बनलेले आहे.
भाविकांचा शॉर्टकर्ट व अपघातांचा धोका
या मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवेशव्दाराबाहेरील जागेत वाहने पार्क करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे प्रचंड संख्येने वाहने रस्त्यावरच असतात. मंदिराच्या प्रवेशव्दारापासून जवळपास वाहने पार्क करण्याचीही संधी नसते. त्यामुळे लांब अंतरावर वाहने पार्क करणारे लोक बिटस् पिलानीच्या गेटस् समोरून धोका पत्करून खाली उतरतात व शार्टकर्टमार्गे मंदिराकडे जातात. यापैकी बऱ्याच लोकांना मंदिराच्या दिशेने येण्यासाठी महामार्ग मधल्यामध्ये पार करावा लागतो. भरधाव वाहतुकही या मार्गावर होत असते. त्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. बिर्ला मंदिर या प्रेक्षणीय स्थळामुळे या महामार्गावर मागच्या महिन्याभरापासून बराच गोंधळ उडत आहे. या स्थळावर येणाऱ्या वाहनांसाठी रस्त्याच्या बाजुच्या खुल्या जमीनीवर पार्किंगची स्वतंत्र सोय होण्याची आवश्यकता आहे.