सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
दासबोध पारायण समितीतर्फे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड सातारा यांच्या सहयोगाने फोंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या दासबोध सामुहिक पारायण सोहळय़ाची नुकतीच सांगता झाली. वरचा बाजार फोंडा येथील श्री विठोबा मंदिरच्या रखुमाई सभागृह हा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पारायण सोहळय़ाची सुरुवात ग्रंथ मिरवणुकीने करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रमाचा भाग म्हणून वैशंपायन रामदासी सज्जनगड तसेच वसंत सुतार, फोंडा यांनी मुख्य वाचक म्हणून ग्रंथ पारायणाची सेवा स्विकारली. पारायण काळात सांप्रदायिक उपासना, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र, करुणाष्टके, सवाया व रामनामावली हा नित्य कार्यक्रम झाला.
ह. भ. प. संध्याताई पाठक (सांगली) यांनी प्रवचने, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून दासांच्या जीवनकार्याचा परामर्श घेतला. त्याला जोडूनच गोमंतकीय आख्यानकार प्रा. रमेश सप्रे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून समर्थ रामदासांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. गौरीश तळवलकर यांचे भक्तीगीत गायन आणि श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र वेलिंग यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
समितीचे अध्यक्ष नारायण नावती यांच्या अधिपत्त्याखाली आरती, शेजारती, नैवेद्य, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी बोलताना श्री. नावती म्हणाले, सन 2006 सालापासून मागील 16 वर्षे हा पारायण सोहळा फेंडय़ात सुरु आहे. दासभक्तांचा तसेच अन्य भाविकांचा त्यात सहभाग वाढत आहे. मंगेश पेंडसे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेले हे कार्य अव्याहतपणे सुरु असून दासभक्तांसाठी हा भक्ती मेळावाच आहे.