केवळ तीन वर्षात उभारणी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी येथे शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान हनुमानाच्या 108 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. हनुमानजी सर्वांना त्यांच्या भक्तीने, त्यांच्या सेवेने जोडतात. प्रत्येकाला हनुमानजीकडून प्रेरणा मिळते. हनुमान ही शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिक असून ‘एक भारत, श्रे÷ भारता’चाही महत्त्वाचा धागा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या भव्य मूर्तीच्या लोकार्पणप्रसंगी म्हणाले.
मोरबी येथील बेला गावाजवळील खोकराधाम येथे हनुमानजींच्या प्रतिमेच्या अनावरणासह रामकथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी बेला गावातून हत्ती-घोडे आदींसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. भक्ती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील साधू-संत खोकराधाम येथे पोहोचले होते.
देशाच्या विविध भागात रामकथेचे पारायण केले जाते. कथेच्या वेळी भाषा आणि बोली कोणतीही असो, पण रामकथेचा भाव सर्वांना एकत्र करतो, भगवंताच्या भक्तीशी जोडतो. त्याने गुलामगिरीच्या कठीण काळातही विविध विभाग आणि विविध वर्गांना एकत्र केले, स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय संकल्पासाठी एकत्रित प्रयत्नांना बळ दिले, असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
‘चारधाम’ प्रकल्पांतर्गत दुसरी भव्य मूर्ती
भगवान हनुमानाशी संबंधित चारधाम प्रकल्पांतर्गत, हनुमानाच्या मूर्ती देशाच्या चारही दिशांना स्थापित केल्या जाणार आहेत. या पर्वातील हनुमानाची ही दुसरी मूर्ती आहे, जी पश्चिम दिशेला आहे. गुजरात मोरबी येथील बापू केशवानंद आश्रमात हनुमान मूर्तीची प्रति÷ापना करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला पुतळा उत्तरेकडील शिमला येथे 2010 साली बसवण्यात आला आहे. ते तयार करण्यासाठी 1.9 कोटी रुपये खर्च आला आहे. तिसरी मूर्ती दक्षिणेला रामेश्वरम येथे उभारण्यात येत असून त्या मूर्तीचे काम सुरू झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. हरीश चंदर नंदा एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा पुतळा बसवला जाणार आहे.