वृत्तसंस्था /इंधेव्होन
सध्या येथे सुरू असलेल्या ‘एफआयएच हॉकी प्रो-लीग’मध्ये भारताने यजमान नेदरलँड्सविऊद्ध एका गोलची आघाडी मिळवूनही शेवटी 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताला तब्बल पाच पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोक मिळूनही एकमेव गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगला (11 व्या मिनिटाला) करता आला. पेपिजन रेयेन्गा (17 व्या मिनिटाला), बोरिस बुर्कहार्टने (40 व्या मिनिटाला) आणि ड्युको तेलगेनकॅम्प (41 व्या व 58 व्या मिनिटाला) यांनी बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यातील नेदरलँड्सच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलताना गोल केले. गेल्या आठवड्याच्या शेवटी लंडनमध्ये लागोपाठ विजय मिळवत भारताने बाजी मारली होती. त्यानंतर इंधेव्होनमधील सामन्यात सुरुवातीला मुसंडी मारताना भारताने 1-0 अशी आघाडी मिळविली होती.
जरी भारताला खेळात स्थिरावण्यास थोडा वेळ लागला, तरी त्यांनी चांगले डावपेच दाखविले. त्यामुळे त्यांना नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात चाल करून जाण्याची संधी मिळण्यास मदत झाली. 11 व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या बचावपटूने फाऊल केल्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला होता. त्यानंतर बचाव फळीत सहेतुक फाऊल केल्यामुळे त्यांना पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. फॉर्ममध्ये असलेल्या हरमनप्रीतने त्याचे ऊपांतर गोलात करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि या मोसमातील आपली वैयक्तिक गोलसंख्या 17 वर नेली. देशवासियांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभलेल्या तऊण नेदरलँड्स संघाने दुसऱ्या सत्रात पेपिजन रेयेन्गाद्वारे सुरेखरीत्या बरोबरी साधून पुनरागमन केले. या बरोबरीच्या गोलाने धक्का बसलेल्या भारताला त्यांची लय परत मिळवण्यासाठी काही मिनिटे लागली. मध्यंतराच्या काही सेकंद आधी नेदरलँड्सला आघाडी घेण्याची मिळालेली संधी भारताच्या अमित रोहिदासने उधळवून लावली. तिसऱ्या सत्रामध्ये यजमानांनी आक्रमणाच्या जोडीला चेंडू जास्त काळ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. तिसरे सत्र सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी जेप होडेमेकर्सचा प्रयत्न भारताचा गोलरक्षक क्रिशन पाठकने पायांचा वापर करून निष्फळ ठरविला. 35 व्या मिनिटाला भारताने उजव्या बाजूने चांगला हल्ला केला असता चेंडू गोलच्या मुखाशी पोहोचून गोल करण्यासाठी चेंडूला हलकासा स्पर्श हवा होता, परंतु गुरजंत सिंगने मारलेला सूर व्यर्थ गेला. शेवटी 40 व्या मिनिटाला बोरिस बुर्कहार्टने भारतीय गोलरक्षक पाठकला चकविले, तर काही सेकंदांनंतर ड्युको तेलगेनकॅम्पने आघाडी 3-1 अशी वाढवली. नेदरलँड्सने लागपोठ गोल करण्याच्या काही सेकंद आधी मनदीप सिंगला हिरवे कार्ड दाखविण्यात आल्याने भारताच्या खेळाडूंची संख्या 10 वर आली. भारताला अंतिम सत्रात काही पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. शिवाय तेलगेनकॅम्पने आणखी एका गोलाची नोंद केल्याने यजमानांची आघाडी वाढली. सामना संपण्यास 30 सेकंद असताना भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता. पण तो गोलरक्षकाने अडfिवला.