व्यवस्थापकीय संचालकाचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट खोब्रावाडा येथे असलेले डेव्हील बार ऍण्ड रेस्टॉरंट पूर्णतः कायदेशीर असून त्याबाबत आमच्याकडे कागदपत्रेही आहेत. माजी मंत्री मनोहर बाबू आजगावकर यांची ही जागा असून आम्ही ती भाडेपट्टीवर घेतली आहे. जे बाऊन्सर येथे आहेत ते आमच्या संरक्षणासाठी आहेत. येथे कोणताही अनैतिक व्यवहार वा डान्सबार चालत नाही. स्थानिक नितेश चोडणकर व स्थानिकांनी एकत्रित येऊन केलेले आमच्यावरील आरोप बिनबुडाचे असून आम्हाला यात मुद्दामहून फसविण्यात येत आहे, अशी माहिती बारचे मालक तथा व्यवस्थापकीय संचालक विवेक शर्मा, देव यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
शाहीन सौदागर यांच्या मुलाला मारहाण झाली ती आमच्या बारपासून 100 मीटर लांब रस्त्यावर झाली आहे. आमच्या कल्ब बारचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. जे व्हिडीओ व्हायरल होत आहे ते आमच्या डेव्हील बारचे नाहीत. शाहीनबाबत जे भांडण झाले त्याच्याशीही आमचा संबंध नाही, असे ते म्हणाले.
नितेश चोडणकर व त्यांच्या साथीदारांनी पत्रकार परिषद बोलावून डेव्हील्स क्लबमध्ये अनैतिक व्यवहार होतात असा आरोप केला. मात्र असे काहीच गैरव्यवहार येथे होत नाही. आम्ही पहिल्याच दिवशी मिडिया व पोलिसांना सीसीटीव्ही पॅमेरा फुटेज दिलेला आहे, असे विवेक शर्मा म्हणाले.
दुसऱया ठिकाणाच्च्या मारहाणीची फुटेज दाखवून ते डेव्हील क्लबचे नाव नाहक बदनाम करू पाहत आहे असा आरोप यादव यांनी केला. जी माणसे आमच्याकडे काम करीत नाही त्यांना डेव्हीलच्या नावे मुद्दामहून घातले जाते असे ते म्हणाले.
यावेळी शाहीन सौदागर म्हणाल्या की, आपण या क्लबमध्ये सुपरव्हायझर म्हणून काम पहाते. ईद निमित्त आपण तत्पूर्वी 12 दिवस रजेवर गेली होती व त्यादिवशी आपण पगार घेण्यासाठी क्लबकडे आली होती. आपल्या मुलावर क्लब बाहेर रस्त्यावर हल्ला झाला. त्या भांडणाचा या क्लबशी काहीही संबंध नाही. आपण याबाबत पोलीस तक्रार नोंदवली पण पोलिसांनी आरोपीना अद्याप पकडलेले नाही असे त्यांनी सांगितले.