डॉ जेवरे गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित
Dr. Chandrakant Jewre passed away
सध्या माजगाव पंचम नगर येथे वास्तव्यास असलेले सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉ चंद्रकांत कृष्णनाथ जेवरे (८६) यांचे शनिवारी रात्री साडे दहा वाजता निधन झाले. सहा दशकाहून अधिक वर्षे रुग्णांची सेवा केलेले डॉ जेवरे गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित होते. त्यांच्यावर दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार येणार आहे.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील डॉ जेवरे १९६३ च्या दरम्यान सावंतवाडीत आले. सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करताना त्यानी योग्य निदानासह रुग्णांना तत्पर आणि कमी खर्चात सेवा दिली. सुरुवातीच्या काळात त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या.
त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ते देवदूत तसेच सर्जन म्हणूनही ते परिचित होते. सावंतवाडी तालुका परिसरात आदराचे स्थान असलेले ते अनेक डॉक्टरांचे ते मार्गदर्शक होते. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी संचालक म्हणून अनेक वर्ष काम केले. तसेच सावंतवाडी रोटरी क्लब मध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. तळवणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ अमोल जेवरे तसेच जेवरे ऑटोमोबाईलचे आनंद जेवरे यांचे ते वडील होत.
ओटवणे / प्रतिनिधी