वृत्तसंस्था/ पाँडेचेरी
सोमवारपासून येथे सुरु झालेल्या 2023 च्या क्रिकेट हंगामातील देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील राऊंड रॉबिन लिग सामन्यात पूर्व विभागाने मध्य विभागाचा 6 गड्यांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य विभागाने 50 षटकात सर्व बाद 207 धावा जमविल्या. त्यानंतर पूर्व विभागाने 46.1 षटकात 4 बाद 208 धावा जमवित या स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मध्य विभागाच्या डावामध्ये रिंकू सिंगने 63 चेंडूत 54 धावा झोडपल्या रिंकू सिंगने एकेरी आणि दुहेरी धावावर भर देत धावफलक हलका ठेवला. त्याने आपल्या खेळीमध्ये 2 षटकार ठोकले. पूर्व विभागाच्या आकाशदीपने 35 धावात 3 तर शहबाझ अहमदने 30 धावात 3 गडी बाद केले. मध्य विभागाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. मध्य विभागाचे शेवटचे 4 फलंदाज केवळ 31 धावात तंबूत परतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पूर्व विभागाच्या डावामध्ये डावखुरा फलंदाज उत्कर्ष सिंगने 104 चेंडूत 89 धावा झळकवताना अभिमन्यू ईश्वरन समवेत पहिल्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. ईश्वरनने 55 चेंडूत 38 धावा केल्या. मध्य विभागातर्फे कर्ण शर्माने 35 धावात 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – मध्य विभाग 50 षटकात सर्व बाद 207 (रिंकूसिंग 54, आर्यन ज्यूएल 39, आकाशदीप 3-35, शाहबाज अहमद 3-30), पूर्व विभाग 46.1 षटकात 4 बाद 208 (उत्कर्ष सिंग 89, ईश्वरन 38, कर्ण शर्मा 3-35).