ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रात्रभर जळगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
जळगाव दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. मात्र, यासंदर्भात पोलीस कोणतीही नोंद घेत नसल्याने खडसे संतापले होते. त्यांनी रात्रभर कार्यकर्त्यांसह जळगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर आठ तासांच्या आंदोलनानंतर दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेण्यात आली.
अधिक वाचा : लटकेंचा अंधेरी पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा; पालिकेने राजीनामा स्वीकारला
दरम्यान, दूध संघात अपहार झाला आहे, असे आंदोलन सुरु झाल्यापासून सांगणाऱ्या एकनाथ खडसेंनी फिर्यादीनंतर युटर्न घेत याप्रकरणात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचे म्हटले आहे. दूध संघातून 14 टन म्हणजे 80 लाखांचे लोणी बाहेरच्या जिह्यांत पाठविण्याचे आल्याचे मालाच्या तपासणीत भासविण्यात आले. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. तर दूध पावडरच्या साठय़ातही 30 ते 35 लाखांच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले, असे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.