केंद्रीय मंत्र्यांसह 150 प्रवासी सुरक्षित
वृत्तसंस्था~ गुवाहाटी
आसाममधील दिब्रुगड येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे रविवारी गुवाहाटीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला. चेन्नई येथून दिब्रुगडला जाणाऱ्या ‘6-ई-2652’ या फ्लाईटमधून 150 हून अधिक लोक प्रवास करत होते. यामध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचाही समावेश होता. त्यांच्यासोबत भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकान आणि तेराश गोवाल्लाही प्रवास करत होते. या मंत्रीमहोदयांसह सर्व दीडशे प्रवासी सुखरुप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लँडिंगपूर्वी विमान 15-20 मिनिटे हवेत राहिले. नंतर त्याचे गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यशस्वी लँडिंगनंतर सर्वजण सुखरूप विमानातून उतरल्याचे केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले. सर्व प्रवाशांना पर्यायी विमानाने दिब्रुगड येथे काही वेळानंतर रवाना करण्यात आले.