जसप्रित बुमराहचे अवघ्या 19 धावात 6 बळी, इंग्लिश भूमीत 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पहिला पेसर
वृत्तसंस्था/ लंडन
उंचापुऱया स्पीडस्टार जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची चांगलीच दाणादाण उडाल्यानंतर भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत महत्त्वपूर्ण विजयी सलामी दिली. बुमराहने 7.2 षटकात अवघ्या 19 धावात 6 बळी घेतल्यानंतर या जोरावर भारताने इंग्लंडचा डाव 25.2 षटकात सर्वबाद 110 धावांमध्येच उखडला आणि 18.4 षटकात बिनबाद 114 धावांसह विजयाचे लक्ष्य सहज साध्य केले.
विजयासाठी 111 धावांचे आव्हान असताना रोहित शर्माने 58 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 76 तर शिखर धवनने 54 चेंडूत 31 धावा जमवल्या. याच धावसंख्येवर ते नाबादही राहिले.
बुमराह यादरम्यान इंग्लंडमधील वनडे सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पहिलाच भारतीय पेसर ठरला. याशिवाय, इंग्लंडसाठी ही भारताविरुद्ध आजवरची निचांकी धावसंख्याही ठरली.
चेंडू उत्तम स्विंग व सीम होत असताना बुमराह व शमी (3-31) यांना सामोरे जाणे इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजासाठी आव्हानात्मक ठरत गेले. जेसॉन रॉयने बुमराहचा फुल अँड वाईड बॉल ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्टीवर ओढवून घेतला. त्यापूर्वी जेसॉनला बुमराहच्या इनस्विंगर्सनी बरेच हैराण केले होते.
दोनच चेंडूंच्या अंतराने बहरातील जो रुट (0) आणखी एका वेगवान इनस्विंगरच्या अपेक्षेत चकला आणि ऑफस्टम्पवरील चेंडूवर त्याने यष्टीमागे रिषभ पंतकडे झेल दिला. बुमराहने या निर्धाव षटकात अशा रितीने दोन बळी घेतले. शमीनेही बेन स्टोक्सला लेंग्थ डिलिव्हरीवर चकवा दिला आणि रिषभ पंतने घेतलेला एकहाती अप्रतिम झेल त्याची खेळी संपुष्टात आणणारा ठरला. पंतने नंतर धोकादायक जॉनी बेअरस्टोचाही दुसरा एकहाती झेल घेत बुमराहला डावातील तिसरा बळी मिळवून दिला. बुमराहने नंतर लिव्हिंगस्टोनला देखील शून्यावरच बाद केले आणि यावेळी इंग्लंडची 5 बाद 26 अशी दाणादाण उडाली. इंग्लिश कर्णधार जोस बटलरने 32 चेंडूत 30 धावांसह थोडाफार प्रतिकार जरुर केला.
नंतर शमीने बटलरला डीप स्क्वेअर लेगवरील यादवकरवी झेलबाद केले. इंग्लंडची यावेळी 7 बाद 59 अशी आणखी दैना उडाली. भारताने हार्दिक पंडय़ा, प्रसिद्ध कृष्णासह 4 जलद गोलंदाज खेळवले आणि ही रणनीती उत्तम यश देऊन
गेली. डेव्हिड विली (26 चेंडूत 21) व कार्स (26 चेंडूत 15) यांनी नवव्या गडय़ासाठी 35 धावांची भागीदारी साकारल्याने इंग्लंडला त्यांचा वनडे क्रिकेटमधील 86 धावांचा निचांक पार करता आला. नंतर बुमराह पुन्हा आक्रमणावर आला आणि त्याने भेदक यॉर्करवर विलीची खेळी संपुष्टात आणली. इथेच इंग्लंडचा डाव संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ः 25.2 षटकात सर्वबाद 110 (बटलर 32 चेंडूत 6 चौकारांसह 30, विली 21. बुमराह 7.2 षटकात 19 धावात 6 बळी, शमी 3-31, प्रसिद्ध कृष्णा 1-26). भारत ः 18.4 षटकात बिनबाद 114 (रोहित नाबाद 76, धवन नाबाद 31. अवांतर 7)