फिफा 17 वर्षाखालील विश्व महिला फुटबॉल स्पर्धा : प्रकार उघड झाल्याने खळबळ
प्रतिनिधी /पणजी
फिफा 17 वर्षाखालील विश्व महिला फुटबॉल स्पर्धेसाठी इव्हेंट मॅनेजमेटसाठी निविदा काढल्या, मात्र वर्क ऑर्डर दिलेलीच नव्हती. सुमारे 3-3 कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फाईल सरकारकडे पाठविल्याचा प्रस्ताव उघड झाल्याने एकच खळबळ माजली.
गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी ट्विट करून गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता रंगाराजू यांनी या संदर्भात फाईलवर एक नोट तयार करून ती फाईल सरकारकडे मान्यतेसाठी पाठविली. मात्र या फाईलमधील गुप्त शेरा हा भगत यांनी जाहीर केल्यानंतर क्रीडा खात्यात गोंधळ उडाला व चौकशी सुरू केली. फिफा 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्यात झाली होती. त्यासाठीचा खर्च हा गोवा क्रीडा प्राधिकरणाद्वारे करण्यात आला होता. या स्पर्धेचे ईव्हेंट मॅनेजमेट हे ज्या फोंडय़ातील एका कंपनीला दिले होते. त्यावरूनही भ्रष्टाचाराची पाळेमुळे कुठेपर्यंत पोहोचलेली आहेत याबाबत चर्चा सुरू झाली होती.
खर्चाला मान्यता न मिळताच व कामाची जबाबदारी दिलेली नसताना खर्च करून मोकळे झाले. त्यामुळे आता या प्रस्तावाला मागाहून मान्यता घेण्यासाठी फाईल क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे पोहोचली आणि मंत्री गावडे हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार होते. तत्पूर्वीच हे प्रकरण उघडकीस आले असल्याने क्रीडा खात्यात एकच खळबळ माजली आहे. गोवा फॉरवर्ड नेता विकास भगत यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान, या संदर्भात मंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.