पती-पत्नीचे वेगवेगळय़ा घरात वास्तव्य, आठवडय़ाच्या अखेरीस होते भेट
लोकांची मानसिकता आणि समाज बदलत आहे. सध्या जपानमध्ये ‘वीकेंड मॅरेज’ ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. लोक विवाहानंतर देखील आपाआपल्या घरांमध्ये राहत आहेत. जोडीदार परस्परांना वीकेंडमध्येच भेटतात आणि स्वतःच्या भावना व्यक्त करतात. तसेच भविष्यासाठीच्या योजना आखतात. कौटुंबिक जबाबदाऱया वाटून घेत असले तरीही नेहमी सोबत राहत नाहीत.
वीकेंड मॅरेजमध्ये पती अन् पत्नी वेगवेगळय़ा घरात राहतात. दोघेही स्वतःच्या घरात स्वमर्जीने जगतात. स्वतःच्या स्वातंत्र्याशी तडजोड न करता देखील विवाहातून मिळणारा आनंद अनुभव आहेत. जपानमध्ये वीकेंड मॅरेजचा वाढता ट्रेंड महिलांना अधिक पसंत पडत आहे. विवाहाच्या व्यवस्थेत महिलांना अधिक तडजोडी कराव्या लागतात असे त्यांचे मानणे आहे. जपानमध्ये महिला पुरुषांपेक्षा 5 पट अधिक घरगुती काम करतात असे एका अहवालात म्हटले गेले.
वीकेंड मॅरेजमध्ये एकटे राहण्याचे दुःख कुणी व्यक्त करत नाहीत. दोघेही परस्परांपासून 1 तासाच्या अंतरावर राहत असतात. आठवडय़ात 2-3 वेळा भेट होत असते. वीकेंड किंवा सेपरेशन मॅरेजमध्ये विवाहित असूनही सिंगल असल्याची फीलिंग प्राप्त होत असल्याचे सांगण्यात येते.
वीकेंड मॅरेजमध्ये भावनात्मक ओढ असते, तसेच यात डोळे बंद करून विश्वास ठेवता येणारा जोडीदारही असतो. घराच्या कामाला केवळ महिलांची जबाबदारी मानली जाते. या महिला नोकरी करणाऱया असल्या तरीही हा प्रकार घडत असल्याचे महिलावर्गाचे म्हणणे आहे.
आत्मनिर्भर असणे आवश्यक
वेगळे राहण्याचे काही तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ मुलांच्या पालपोषणात जोडीदाराची मदत मिळत नाही. घरातील कामे एकटय़ानेच करावी लागतात. वीकेंड मॅरेजमध्ये आर्थिक दृष्टय़ा दोघांनीही आत्मनिर्भर असणे आवश्यक असते. दोघेही आत्मनिर्भर नसल्यास वीकेंड मॅरेज चालू शकत नाही. वीकेंड मॅरेजप्रकरणी जपानच्या काही पुरुषांचे स्वयंपाक तयार करण्यापासून कपडे धुण्यापर्यंतचे काम स्वतःलाच करावे लागत असेल तर अशा विवाहाचा काय लाभ असे मानणे आहे.