पुढील वर्षी जानेवारीत आयोजन, भारताची सलामी यजमानांशी, 16 संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/ दुबई
19 वर्षांखालील महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची घोषणा आयसीसीने शुक्रवारी केली असून पुढील वर्षी जानेवारीत ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच होणार आहे.
भारताचा ड गटात समावेश करण्यात आला असून याच गटात स्कॉटलंड, यजमान दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिरात यांचाही समावेश आहे. 14 ते 29 जानेवारी या कालावधीत होणाऱया या स्पर्धेत 14 जानेवारी रोजीच भारताची पहिली लढत होईल. त्यानंतर 16 जानेवारीस संयुक्त अरब अमिरात व 18 जानेवारीस स्कॉटलंडविरुद्ध भारताचे पुढील साखळी सामने होतील. युवा महिलांसाठी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत भविष्यातील संभाव्य स्टार महिला क्रिकेटपटूंचा खेळ पहावयास मिळणार असून एकूण 16 संघांचा त्यात सहभाग असेल. यातील 41 सामने बेनोनी व पोश्चेफस्ट्रूम येथे खेळविले जातील.
11 आयसीसीचे पूर्ण सदस्य व 5 संलग्न सदस्य देशांचे संघ यात भाग घेतील. प्रत्येक गटातील पहिले तीन संघ सुपर सिक्स लीगमध्ये खेळण्यास पात्र ठरतील, यात गट अ मधील संघ गट ड मधील संघांविरुद्ध तर गट ब मधील संघ गट क मधील संघांविरुद्ध खेळतील. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत इंडोनेशिया व रवांडा हे दोन संघ प्रथमच सहभागी होत आहेत. गेल्या जुलैमध्ये इंडोनेशियाने पूर्व आशिया पॅसिफिक विभागात पापुआ न्यू गिनिया संघाला हरवून तर रवांडाने 12 सप्टेंबर रोजी टांझानियाचा पराभव करून या वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली.
या स्पर्धेत प्रत्येकी दिवशी चार सामने खेळविले जातील. पहिल्या दिवशी बांगलादेश-ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका-भारत, यूएई-स्कॉटलंड, लंका-अमेरिका असे सामने होतील. 27 जानेवारी रोजी उपांत्य व अंतिम सामना 29 रोजी पोश्चेफस्ट्रूम येथे होणार आहेत. या स्पर्धेनंतर थोडय़ा कालावधीने दक्षिण आफ्रिकेत वरिष्ठ महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धाही होणार आहे.