प्रतिनिधी / बेळगाव
शहरात प्रत्येक घरात स्वयंपाक करण्यासाठी गॅसची आवश्यकता भासते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत घरोघरी पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत 21 हजार घरांमध्ये पाईपलाईनद्वारा गॅस पोहोचला असून आणखी 9 हजार नागरिक गॅसजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण शहरात ही योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने मेघा इंटरप्रायझेस या गॅस कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.
चोवीस तास पाणी योजना आणि घरोघरी गॅसलाईन देण्याची योजना स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत आहे. शहरातील विविध भागात गॅसलाईनद्वारा घरोघरी गॅसपुरवठा करण्यात येत आहे. मेघा गॅस कंपनीद्वारे ही योजना राबविण्यात येत असून घरोघरी गॅस जोडणीसाठी 29 हजार 560 नागरिकांनी नेंदणी केली होती. यापैकी 21 हजार घरांमध्ये गॅसजोडणी करण्यात आली आहे. उर्वरित अर्जदारांना गॅसजोडणी करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बसवनकोळ येथे गॅस पुरवठा केंद्राचे मुख्य कार्यालय असून तेथून संपूर्ण शहरात गॅसलाईन घालण्यात आल्या आहेत.
तसेच व्यावसायिक उपयोगासाठी गॅसपुरवठा करण्याकरिता कंपनीने प्राधान्य दिले आहे. शहरात चार ठिकाणी सीएनजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आणखी चार ठिकाणी सीएनजी केंदे सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बेळगाव जिल्हय़ात 25 ठिकाणी सीएनजी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ज्या ठिकाणी गॅसलाईन नाही त्या सीएनजी केंद्रांना सिलिंडरद्वारा गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. याकरिता बसवनकोळ येथे सिलिंडर फिलिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही सीएनजी केंद्र आणि घरोघरी गॅसजोडणी देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. पावसाळय़ानंतर हे काम सुरू करण्यात येणार आहे. सांबरा येथील एअरफोर्स वसाहत तसेच अन्य गावांना गॅसलाईनद्वारा घरोघरी गॅसजोडणी करून देण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
120 हॉटेल्सना गॅसजोडणी, 36 कारखान्यांमध्ये गॅसपुरवठा
रामतीर्थनगर, ऑटोनगर, सदाशिवनगर, वैभवनगर, महांतेशनगर, माळमारुती अशा विविध भागात गॅसलाईन घालून जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर आदी भागात गॅसलाईन घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. 120 हॉटेल्सना गॅसजोडणी करून देण्यात आली असून 36 कारखान्यांमध्ये गॅसलाईनद्वारा गॅसपुरवठा केला जातो. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात देखील घरोघरी गॅसपुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हिंडलगा गावात गॅसजोडण्या करून देण्यात आल्या असून विजयनगर, लक्ष्मीनगर, डिफेन्स कॉलनी अशा वसाहतींमध्ये गॅसलाईन घालण्याचे काम पूर्ण झाले असून गॅसजोडणी करून देण्यात येत आहे.