हिंडेनबर्गच्या अहवालानंतर संपत्तीतील घसरण सुरूच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची डोकेदुखी काही संपताना दिसत नाही. अमेरिकन रिसर्च फर्म आणि शॉट शेलिंग कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समधील त्सुनामी संपलेली नाही. परिणामी, अदानींची एकूण संपत्ती सातत्याने घसरत आहे. आता ते जगातील टॉप 30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. फोर्ब्सच्या रिअलटाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी सध्या श्रीमंतांच्या यादीत 33 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांना गेल्या एका महिन्यात सुमारे 81 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. सध्या, अदानी हे 35.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 33 वे अब्जाधीश आहेत.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरू झालेली घसरण अजूनही संपलेली नाही. हा अहवाल येऊन एक महिना होत आला आहे, मात्र अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स अजूनही सातत्याने घसरत आहेत. शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थवरही होत आहे. हिंडेनबर्ग अहवालापूर्वी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता पहिल्या 30 मधून बाहेर पडले आहेत. हिंडेनबर्गने 23 जानेवारी रोजी आपला अहवाल प्रकाशित केला. या अहवालात गौतम अदानी यांच्यावर शेअर बाजारात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा अहवाल अमेरिकेत प्रसिद्ध झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये तारांबळ उडाली होती. एक-दोन दिवसांत लोकांना या अहवालाची माहिती मिळताच अदानी समूहाचे शेअर्स घसरायला लागले. महिन्याभरानंतरही घसरणीचा हा टप्पा थांबलेला नाही.
हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाला तेव्हा अदानी 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. त्यांच्या पुढे इलॉन मस्क, बर्नार्ड अरनॉल्ड आणि जेफ बेझोस होते. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर 15 दिवसांत अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. त्यानंतर ते टॉप 20 यादीतून बाहेर पडले. त्यानंतर आता शनिवारी ते टॉप 30 च्या यादीतून बाहेर पडले आहेत.